शेतकरी कर्जमाफी आंदोलन: प्रशांत डिक्कर यांचा तेल्हारा तालुक्यात गावभेटींना प्रारंभ. अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) तेल्...
शेतकरी कर्जमाफी आंदोलन: प्रशांत डिक्कर यांचा तेल्हारा तालुक्यात गावभेटींना प्रारंभ.
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तेल्हारा, २० जुलै २०२५: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी पुकारलेल्या २४ जुलैच्या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा दर्शवत स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी तेल्हारा तालुक्यात गावभेटींना सुरुवात केली आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी प्रशांत डिक्कर यांनी तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि सर्व शेतकऱ्यांना आंदोलनात ताकदीने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. प्रशांत डिक्कर यांनी गावभेटीं दरम्यान शेतकऱ्यांना उद्देशून सांगितले, "महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सत्तेत आल्यानंतर हे आश्वासन विसरले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तर संपूर्ण कर्जमाफी हाच पर्याय आहे. बच्चूभाऊ कडू यांनी पुकारलेल्या २४ जुलैच्या आंदोलनात राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवावी."तेल्हारा तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांशी चर्चा करताना डिक्कर यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. "शेतकरी कष्ट करतो, पण कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आता एकजुटीने लढण्याची वेळ आली आहे," असे ते म्हणाले.या आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळावा यासाठी प्रशांत डिक्कर यांनी गावागावांत कार्यकर्त्यांना एकत्रित केले असून, आंदोलन यशस्वी करण्यासाठी रणनीती आखली आहे. बच्चूभाऊ कडू यांनी यापूर्वी १३८ किलोमीटरची पदयात्रा काढून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली होती. आता २४ जुलै रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत राज्यभरात चक्काजाम आंदोलन होणार आहे, ज्याला स्वराज्य पक्षासह इतर काही पक्षांनीही समर्थन जाहीर केले आहे.प्रशांत डिक्कर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, "२४ जुलैच्या आंदोलनात सहभागी होऊन आपल्या हक्कांसाठी लढा द्या. शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईपर्यंत आणि त्यांना सन्मानाने जगता येईल अशी व्यवस्था निर्माण होईपर्यंत हा लढा सुरू राहील. या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी शेतकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने सहभाग घ्यावा, असे स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी आवाहन केले आहे.यावेळी मुन्ना पाटील मन्नतकार, कुलदीप बाजारे, रही गवळी, रोशन देशमुख सह कार्यकर्त्ये उपस्थित होते..
No comments