आसराबारी येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) काल दिनांक 16 जुलै रोजी संध्याकाळी यावल तालुका...
आसराबारी येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर
भरत कोळी यावल ता.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
काल दिनांक 16 जुलै रोजी संध्याकाळी यावल तालुका विधी सेवा समितीच्या वतीने यावल तालुक्यातील वड्री ग्रामपंचायत विभागात असलेल्या तसेच सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या आसराबारी या आदिवासी वस्तीवर जाऊन जनजागृती शिबिर घेण्यात आले.
सातपुड्याच्या कुशीत वसलेले आसराबारी हे साधारण 100 ते 150 झोपड्या वजा घरे असलेलं तसेच 100% आदिवासी वस्ती असलेलं गाव. दुर्गम भागात असल्यामुळे या गावाचा शहरी भागाशी अत्यल्प संपर्क येतो. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार द्वारे राबवल्या जाणाऱ्या शासकीय योजनांपासून येथील नागरिक वंचित राहू नये या उद्देशाने यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायमूर्ती आर एस जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती यावल च्या वतीने हे कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आले.
शिक्षणाचा अभाव, रोजंदारीसाठी भटकंती, डाकिन सारख्या कुप्रथा, अत्यल्प उत्पन्न, इतर समाजाकडून अपमान जनक वागणुकीची भीती, बालविवाह पद्धती यांसारख्या कारणांमुळे शिवाय दुर्गम भागात वन जमिनीवर अवैध वस्ती करून राहत असल्यामुळे मुख्य प्रवाहातून या जमातींचा संपर्क तुटतो. या जमातींना घटनेने दिलेले अधिकार आणि शासनाद्वारे चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते शशिकांत वारूळकर हे होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तडवी तसेच समांतर विधी सहाय्यक अजय बढे व हेमंत फेगडे यांनी परिश्रम घेतले.
No comments