प्रवीण गायकवाडांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन प्रा. सुधीर महाले एरंडोल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) एर...
प्रवीण गायकवाडांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन
प्रा. सुधीर महाले एरंडोल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एरंडोल - संभाजी ब्रिगेडचे नेते प्रविण गायकवाड यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणार्या सराईत गुन्हेगार असलेल्या सर्वच गुन्हेगारांना मकोका लावण्यात यावा आणि संविधानविरोधी, लोकशाही विरोधी, कडव्या, उजव्या, विषमतावादी शक्तींचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करीत एरंडोलला मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेडसह परिवर्तनवादी संघटनेतर्फे निषेध व्यक्त करत पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, अलीकडील काळात महाराष्ट्र भरात सराईत गुन्हेगार मोकाट सुटलेले असून सर्वसामान्यांपासून बुध्दीजीवी, विद्वान व अनेक सामाजीक चळवळींच्या नेत्यांना त्यांचा त्रास सुरु आहे. संविधानाची आणि परिवर्तनवादी भूमिका मांडणार्या कार्यकर्त्यांवर सातत्याने हल्ले सुरू आहेत. यात लोकशाही विरोधी, संविधान विरोधी, कडव्या उजव्या जातीवादी शक्तींचा हात आहे. यामुळे महाराष्ट्राच्या शांतता व सुरक्षतेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा सराईत गुन्हेगारांचा तत्काळ बंदोबस्त करण्यात येवून अटक करण्यात यावी या मागणीसह संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारा जनसुरक्षा विधेयक कायदा रद्द करण्यात यावा, वारंवार राजकीय आश्रयाच्या जोरावर महाराष्ट्राचा गुंडाराष्ट्र करू पाहणार्या लोकांना त्वरित अटकाव करण्यात यावा, यापुढे भविष्यात परिवर्तनवादी चळवळीत काम करणार्या कुठल्याही कार्यकर्त्यांवर किंवा नेत्यांवर अशा प्रकारचा हल्ला कुठल्याही धर्मांध कट्टर किंवा गुंडांनी केल्यास त्याला तसेच प्रत्युत्तर देण्यात येईल व या संबंधित घटनेला प्रशासन जबाबदार राहील. त्यामुळे प्रशासनाने वेळीच अशा समाजविघातक काम करणार्या गुंडांना कायद्याच्या आधारे जरब बसवावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. निवेदनाची प्रत पोलिस अधिक्षक जळगांव यांना देखील पाठविण्यात आली आहे. निवेदनावर डॉ. सुरेश पाटील, प्रा. शिवाजीराव अहिरराव, रवींद्र पाटील, अतुलदादा पाटील, अभिजीत पाटील, राकेश पाटील सर, स्वप्निल सावंत, हिंमत पाटील, गुलाब पाटील, नानाभाऊ पाटील, संभाजी देसले, मुकेश देवरे, संदीप पाटील, अजय पाटील, गजानन पाटील, रूपेश वाघ, प्रा. रघुनाथ निकुंभ, के. डी. पाटील, गोटू पाटील यांचेसह मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments