पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याची दोन वर्षे वेतनवाढ रोखली ? जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) (जळगाव):- जिल्ह्यात...
पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याची दोन वर्षे वेतनवाढ रोखली ?
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
(जळगाव):- जिल्ह्यातील पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित राजेंद्र साळुंखे यांच्यावर शासनाने शिस्तभंगाची कारवाई करत पुढील दोन वर्षांसाठी वेतनवाढ रोखण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित वेतनवाढीचा परिणाम पुढील वाढींवर होणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
माहितीनुसार, डॉ. साळुंखे यांनी शासकीय सेवेत असताना खाजगी व्यवसाय केल्याची तक्रार जळगाव येथील आरोग्य विषयक अभ्यासक दिनेश कडू भोळे यांनी केली होती. त्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने चौकशी करून पाचोरा येथील ‘वृंदावन हॉस्पिटल’मध्ये भूलतज्ज्ञ म्हणून सेवा दिल्याचे प्रथमदर्शनी आढळल्याचे अहवालात नमूद केले. तसेच ते शासनाकडून नॉन-प्रॅक्टिसिंग अलाऊन्स (NPA) घेत असल्याचेही स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत विभागीय चौकशी सुरू करण्यात आली. दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी सादर केलेल्या लेखी निवेदनात संबंधित दिवशी भूलतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने रुग्णसेवेच्या हेतूने सेवा दिल्याचे डॉ. साळुंखे यांनी मान्य केले. दोषारोप कबूल केल्याने पुढील चौकशीची गरज नसल्याचे नमूद करत शासनाने नियम ८(५)(अ) अन्वये दोन वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावली.
दरम्यान, दिनेश भोळे यांनी या कारवाईनंतरही संबंधित अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून व्यवसायरोध भत्ता व्याजासह वसूल करावा व सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी केली असून यासाठी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
या प्रकरणामुळे जळगाव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

No comments