फैजपूर येथील जे.टी.एम. विद्यालयात 'पॉक्सो' कायद्यावर मार्गदर्शन शिबीर ९० टक्के घटनांमध्ये ओळखीच्या व्यक्तींचा समावेश; विद्यार्थ्या...
फैजपूर येथील जे.टी.एम. विद्यालयात 'पॉक्सो' कायद्यावर मार्गदर्शन शिबीर
९० टक्के घटनांमध्ये ओळखीच्या व्यक्तींचा समावेश; विद्यार्थ्यांनी जागरूक राहण्याचे आवाहन
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तालुका विधी सेवा समिती, यावलच्या वतीने फैजपूर येथील जे.टी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 'बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१२' (पॉक्सो) अंतर्गत विद्यार्थी प्रबोधनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्री. आर. एस. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडले.
स्वसंरक्षणासाठी 'नाही' म्हणायला शिका
कार्यक्रमाचे मुख्य वक्ते श्री. शशिकांत वारूळकर यांनी विद्यार्थ्यांना बाल लैंगिक अत्याचाराबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, "बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक घटनांमध्ये जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्तींचा समावेश असतो. अशा वेळी विद्यार्थ्यांनी कोणालाही न घाबरता जागरूक राहणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता चुकीच्या गोष्टींना 'नाही' म्हणण्याची हिंमत विद्यार्थ्यांनी दाखवावी."
वारूळकर यांनी पुढे बोलताना विद्यार्थ्यांना 'गुड टच' (चांगला स्पर्श) आणि 'बॅड टच' (वाईट स्पर्श) यातील फरक अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितला. एखादी संशयास्पद घटना घडत असल्याचे लक्षात आल्यास तातडीने तिथून निघून जावे आणि हा प्रकार शिक्षक किंवा पालकांच्या निदर्शनास आणून द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. मोजेस जाधव होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार शाळेच्या पर्यवेक्षिका पूनम नेहते यांनी मानले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तडवी, समांतर विधी सहाय्यक अजय बढे, हेमंत फेगडे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर बाबींविषयी मोठी जागरूकता निर्माण झाली आहे.

No comments