मोरखेड येथे पांदण रस्त्याच्या कामात अतिक्रमण करून अडथळा; तहसीलदार समाधान जी. सोनवणे यांचे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश अमोल बावस्का...
मोरखेड येथे पांदण रस्त्याच्या कामात अतिक्रमण करून अडथळा; तहसीलदार समाधान जी. सोनवणे यांचे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर : तालुक्यातील मोरखेड शिवारातील शासकीय पांदण रस्त्याच्या कामात काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक अतिक्रमण करून अडथळा निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मोरखेड-दाभाडी या सरकारी पांदण रस्त्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले असताना, उर्वरित कामात खोडा घालणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी मोरखेड येथील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष आणि पीडित शेतकऱ्यांनी मलकापूरचे तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे धाव घेतली होती. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मा. तहसीलदार समाधान जी. सोनवणे यांनी तत्काळ एका पत्राद्वारे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस स्टेशनला आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोरखेड ते दाभाडी या सरकारी रस्त्याने परिसरातील जवळपास १०० ते १५० शेतकऱ्यांच्या गाडीबैलांची ये-जा सुरू असते. हा रस्ता शासनातर्फे पांदण रस्ता म्हणून मंजूर झाला असून त्याचे ९० टक्के कामही पूर्ण झाले आहे. शासकीय यंत्रणेमार्फत या रस्त्याची मोजणी होऊन व खुणा कायम करूनच कच्चे काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी संबंधितांनी कोणताही आक्षेप घेतला नव्हता.
जेसीबीने रस्ता खोदल्याचा आरोप रस्त्याचे कच्चे काम पूर्ण झाल्यानंतर ८ जून २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजताच्या सुमारास नामदेव कडू महाले आणि गुलाब दयाराम जंगले (दोन्ही रा. मोरखेड) यांनी जेसीबी मशीन मागवून घेतली. या मशीनच्या साहाय्याने त्यांनी तयार रस्ता खोदून त्यावर काळी माती टाकली आणि पूर्वी केलेले अतिक्रमण कायम ठेवले, असा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी अवघी १० फूट उरली आहे.
समजावूनही ऐकण्यास नकार
रस्ता खोदल्यानंतर गावचे सरपंच पराग अरुण नाफडे, उपसरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्ष शं. मा. मोरे यांनी संबंधितांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कोणाचेही ऐकण्यास स्पष्ट नकार दिला. हे अतिक्रमण जर त्वरित हटवले नाही, तर पूर्वेकडील शेतकरी बांधवांना आपली वाहने व गाड्या वळवणे कठीण होईल आणि ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली होती.
तहसीलदार समाधान जी. सोनवणे यांची तत्पर कारवाई
या बेकायदेशीर कृत्यामुळे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला असून रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ९ जून २०२६ रोजी शेतकऱ्यांनी या प्रकरणी तक्रार अर्ज सादर केला. या निवेदनाची तत्काळ दखल घेत मलकापूरचे तहसीलदार समाधान जी. सोनवणे यांनी विषयाचे गांभीर्य ओळखून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या आणि रस्ता खोदणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे निर्देश देणारे पत्र थेट पोलीस स्टेशनला (पोस्टे) जारी केले आहे. तहसीलदार सोनवणे यांच्या या धडक आणि तत्पर कारवाईमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
निवेदन देतेवेळी दिपक चांभारे पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख - मलकापूर, श्री. अजयजी टप प्रहार, जिल्हा उपप्रमुख, मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा, तानाजी वामन जंगले, सरपंच पराग नाफडे, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यासह निवांत त्र्यंबक तांगडे, रवींद्र जंगले, गणेश जंगले, राजेंद्र जंगले, निनाजी सातव, अनिल इंगळे, अविनाश इंगळे यांसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या उपस्थित होते.

No comments