बीएड प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या मनोरुग्णांच्या कार्यातील समस्या, आव्हाने व कार्यपद्धती वेले येथील मानव सेवा तीर्थ येथे दि...
बीएड प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या मनोरुग्णांच्या कार्यातील समस्या, आव्हाने व कार्यपद्धती
वेले येथील मानव सेवा तीर्थ येथे दिली क्षेत्रभेट
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन करणाऱ्या मानव सेवा तीर्थ या संस्थेस भेट दिली. तेथील कार्यपद्धती व या मनोरुग्णांची सेवा करत असताना येणाऱ्या समस्या व आव्हाने यांची माहिती जाणून घेतली. शिक्षक हा समाज परिवर्तनाचा घटक असल्यामुळे शिक्षकांमध्ये विविध जीवन कौशल्यांची रुजवणूक होणे आवश्यक आहे.
याच हेतूने संस्थेच्या सचिव माधुरी मयूर यांच्या प्रेरणेने चोपडा येथे अमर संस्था संचलित मनोरुग्णांसाठी असलेल्या मानव सेवा तीर्थ या संस्थेस भेट देऊन भावी शिक्षकांमध्ये सेवाभावी वृत्ती या जीवन कौशल्याची रुजवण करण्याच्या उद्देशाने या संस्थेस भेट देण्याचे नियोजन करण्यात आले. सदर संस्थेस दिनांक १२ रोजी भेट देऊन तेथील व्यवस्थापक एन. आर. पाटील यांच्याकडून संस्थेच्या कार्य विषयक सर्व प्रकारची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.
उपस्थित विद्यार्थी व शिक्षकवृंदाना माहिती देतांना मानव सेवा तीर्थ चे व्यवस्थापक एन.आर.पाटील माहिती देत असताना एन.आर.पाटील म्हणाले की, सद्यस्थितीमध्ये राज्यातील विविध भागातील १३२ मनोरुग्ण या ठिकाणी दाखल आहेत, यांची सेवा करणे व योग्य औषधोपचार करणे इत्यादी कामे या ठिकाणी केली जातात. या मनोरुग्णांचा प्रवेश संस्थेमध्ये पोलिसांच्या मदतीने केला जातो. रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला इतरत्र भटकंती करणारे देखील मनोरुग्ण या ठिकाणी आहेत. या मनोरुग्णांना सांभाळताना अनेक समस्या येतात.
एकमेकांमध्ये मारामारी करणे, संस्थेतून पळून जाण्याचे प्रयत्न करणे, औषधोपचार घेण्यासाठी प्रतिसाद न देणे,संस्थेमध्ये कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांवर देखील हल्ला करणे अशी कृत्य यांच्याकडून होत असतात. या सर्व समस्यांवर मात करून यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार करून कौटुंबिक मायेने त्यांची सेवा केली जाते.त्यांची प्रकृती शारीरिक व मानसिकदृष्ट्या ठीक झाल्यावर त्यांच्याकडून त्यांची कौटुंबिक माहिती मिळाल्यावर त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले जाते. शिक्षणशास्त्र महाविद्यालयाकडून या सर्व मनोरुग्णांना फळ व बिस्किट स्वरूपात अल्पपोहार देण्यात आला. सर्व विद्यार्थी व प्राध्यापक यांनी २१०० रुपये रक्कम जमा करून संस्थेच्या कार्यात सहकार्य करण्यासाठी आर्थिक मदत दिली. या क्षेत्रभेटीसाठी महाविद्यालयाच्या आय. क्यू. ए. सी समितीचे सदस्य गोविंद गुजराथी, डी. टी. महाजन, प्राचार्य डॉ. रजनी सोनवणे, समन्वयक प्रा. एन. डी. वाल्हे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. सविता जाधव, मुख्य लिपिक शरद पाटील व शिक्षकेतर कर्मचारीवृंदांचे सहकार्य लाभले.




No comments