चिनावल ला दारूचे दुकान स्थलांतरास ग्रामसभेत विरोध; दारु दुकानासमोरच ग्रामस्थांचा ठिय्या ग्रा.पं. सदस्याच्या राजीनाम्याची मागणी रावेर प्र...
चिनावल ला दारूचे दुकान स्थलांतरास ग्रामसभेत विरोध; दारु दुकानासमोरच ग्रामस्थांचा ठिय्या
ग्रा.पं. सदस्याच्या राजीनाम्याची मागणी
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील चिनावल येथील ग्रामपंचायत ची महिला व जनरल ग्रामसभा २४ डिसेंबरला ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. त्यात मागील सभेत मंजूर झालेल्या काही विषयांवर ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेत ते नामंजूर करण्याचा आग्रह धरला. सभेत चिनावल गावातील वाघोदा बु रोडवरील देशी दारूचे दुकान स्थलांतराचा मुख्य मुद्दा गाजला. वाघोदा रोडवरील या दुकानाचे एका ग्रा.पं.सदस्यांच्या पतीच्या नावे असलेल्या जागेत स्थलांतर झाले आहे. त्यावर खडाजंगी होऊन दुसरे सदस्य सागर भारंबे यांनी संबंधित सदस्याच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान, ग्रामसभा होताच ग्रामस्थांनी या दारु विक्री दुकानासमोर च ठिय्या आंदोलन केले.
सरपंच ज्योती भालेराव ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. या ग्रामसभेत अजेंड्यावरील विषय घेण्याआधी उपस्थित ग्रामस्थांनी वाघोदा रोडवरील जयस्वाल यांचे देशी दारू विक्रीचे दुकान गावातील कुंभारखेडा रोडवरील माजी सरपंच चंद्रकांत भंगाळे यांच्या मालकीच्या जागेत स्थलांतरित कसे काय झाले? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावरून एकच गोंधळ उडाला. मागील ग्रामसभेत हे दुकान स्थलांतराला सर्वांचा एकमताने विरोध होता. ज्या ग्रा.पं.सदस्याच्या पतीच्या जागेत हे दुकान स्थलांतरीत झाले, त्यांनीही गेल्या सभेत विरोध केला होता. त्यामुळे सागर भारंबे संबंधित महिला ग्रा.पं.सदस्याने राजीनामा द्यावा अशी मागणी केली. शेवटी या परिसरातील सर्व दारूची दुकाने गावाबाहेर स्थलांतरित करण्याचा ठराव झाला. नंतर अजेंड्यावरील सर्व विषय वाचून चर्चा करण्यात आली.
-----
तब्बल तीन चालली ग्रामसभा
सकाळी १० वाजता सुरू झालेली ग्रामसभा दुपारी १ वाजेपर्यंत चालली. ग्रामविकास अधिकारी कैलास भगत यांनी प्रोसिडिंग वाचन केले. त्यात रोजगार सेवक भरती, ग्रा.पं.कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेले विम्याचे पैसे कंपनीकडे भरण्याची मागणी महिला सफाई कामगारांनी केली. ग्रामस्थ जयेश इंगळे, संजय भालेराव, अविनाश पाटील, मनोज फालक, भास्कर भिरुड, चंद्रकांत भंगाळे आदींनी चर्चेत भाग घेतला. सरपंच भालेराव यांनी विकास कामांवर चर्चा करा असे आवाहन केले.
-----
दारूच्या दुकानासमोर ग्रामस्थांचा ठिय्या
ग्रामसभेनंतर ग्रामस्थांनी देशी दारूच्या दुकानाकडे मोर्चा वळवून तेथे ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत दुकान बंद होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्र घेतला. शेवटी सावद्याचे एपीआय विशाल पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत ग्रामस्थांची समजूत घातली. यावेळी संबंधित दारू विक्रेता दुकानदाराने कोणाच्या परवानगीनुसार दुकान स्थलांतरित केले त्याची कागदपत्रे आंदोलक ग्रामस्थांना दाखवली. पण, ग्रामसभेचा विरोध असूनही हे स्थलांतर झाल्याचे समोर आले.
-----
दोन्ही दुकानांच्या स्थलांतरासाठी पत्र
संबंधित देशीदारूचे दुकान स्थलांतर करण्याचा विषय मागील ग्रामसभेत नामंजूर करण्यात आला होता. गावातील एकमेकांच्या शेजारी असलेली दोन्ही दुकाने गावाबाहेर स्थलांतरीत करावी, असे पत्र महिनाभरापूर्वी ग्रा.पं.ने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. आम्ही ग्रामस्थांसोबत आहोत.
- ज्योती भालेराव, सरपंच, चिनावल


No comments