एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील जि.प.शाळेच्या मुख्याध्यापकास एक हजाराची लाच स्वीकारतांना एसीबीने रंगेहाथ पकडले, शिक्षण क्षेत्रामध्ये ख...
एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील जि.प.शाळेच्या मुख्याध्यापकास एक हजाराची लाच स्वीकारतांना एसीबीने रंगेहाथ पकडले, शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ
जळगाव जिल्हा प्रतिनिधी /समाधान पाटील
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
एरंडोल-शाळेच्या इंस्पेक्शनचा चांगला शेरा लिहावा यासाठी शिक्षण विस्तार अधिका-यांना दहा हजार रुपये द्यावे लागणा आहेत असे सांगून शाळेतील शिक्षकाकडून एक हजाराची लाच स्विकारतांना पिंपळकोठा (ता.एरंडोल) येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेतील मुख्याध्यापकास लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले.याप्रकरणी मुख्याध्यापकासह पंचायत समिती शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी यांनाही संशयित आरोपी करण्यात आल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी,की पिंपळकोठा (ता.एरंडोल) येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेचे इंस्पेक्शन शिक्षण विस्तार अधिकारी जे.डी.पाटील यांनी सोमवारी (ता.१३) केले होते.शाळेच्या इंस्पेक्शनवर चांगला शेरा लिहावा यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी जे.डी.पाटील यांनी दहा रुपयांची मागणी केली असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक बळीराम सुभाष सोनवणे (वय-५५) यांनी सहकारी शिक्षकांना सांगितले.शाळेतील शिक्षकांकडून मुख्याध्यापक बळीराम सोनवणे यांनी प्रत्येकी एक हजार रुपये यापूर्वीच स्वीकारले होते तर दोन शिक्षकांनी पैसे देण्यास विरोध करून जळगाव येथील लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली.लाच लुचपत विभागाच्या पथकाने तक्रारीप्रमाणे पंचांसमक्ष पडताळणी केली असता मुख्याध्यापक बळीराम सोनवणे यांनी संशयित आरोपी शिक्षण विस्तार अधिकारी जे.डी.पाटील यांना दहा हजार रुपये द्यावयाचे असून तुम्हाला पैसे द्यावेच लागतील असे सांगून तक्रारदाराकडून एक हजार रुपये स्विकारतांना मुख्याध्यापक कार्यालयातच पथकाने रंगेहाथ पकडले.यातील संशयित आरोपी शिक्षण विस्तार अधिकारी जे.डी.पाटील यांचेशी फोनद्वारे पडताळणी केल्यानंतर त्यांनी दोन हजार रुपये मिळाल्याबद्दल कोणताही विरोध दर्शवला नाही व नंतर कॉल करतो असे सांगून फोन ठेवून दिला.लाच मागणीमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी जे.डी.पाटील यांचाही सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांनाही संशयित आरोपी करण्यात आले आहे.लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक उपनिरीक्षक सुरेश पाटील,हवालदार बाळू मराठे राकेश दुसाने यांच्या पथकाने कारवाई केली.दरम्यान शिक्षण विस्तार अधिका-यांसाठी लाच स्वीकारणा-या मुख्याध्यापकास रंगेहाथ पकडल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून शिक्षण विभागाचे धिंडवडे निघाले आहेत.याबाबत एरंडोल पोलीसस्थानकात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.

No comments