सोनवद बु. येथे श्रीराम नवमीपासून ३५० वर्षांची परंपरा – रामायणावरील 'वन्हे' सादरीकरणाने गावात उत्सवाचे वातावरण विकास पाटील जळगाव ...
सोनवद बु. येथे श्रीराम नवमीपासून ३५० वर्षांची परंपरा –
रामायणावरील 'वन्हे' सादरीकरणाने गावात उत्सवाचे वातावरण
विकास पाटील जळगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव : सोनवद बु. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील सोनवद बु. येथे गेल्या ३०० ते ३५० वर्षांपासून चालत आलेली पारंपरिक 'वन्हे' (पात्र सादरीकरण) ही परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. श्रीराम नवमीच्या दिवशी, म्हणजेच ६ एप्रिलपासून रामायणातील विविध प्रसंगांचे सादरीकरण श्रीराम मंदिर आणि मारुती मंदिराच्या प्रांगणात आयताकृती पटांगणात करण्यात येणार आहे.
'वन्हे' या परंपरेला अहिराणी भाषेत ‘पात्र’, ‘वहन’, ‘वाहन’ असेही म्हटले जाते. या माध्यमातून रामायणातील पात्रे व त्यांचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचवणे आणि पुढील पिढीला संस्कारपूर्वक सांगणे हा यामागील उद्देश असल्याचे कलाकार व चालक सुरेश चुडामन पाटील यांनी सांगितले.
या रामायण सादरीकरणाची सुरुवात गणेश प्रार्थनेने होते. त्यानंतर चोपदारांचे आगमन व विदूषकांची हास्यफोड सादर केली जाते. पहिल्या दिवशी गणपती, सरस्वती व विविध ऋषींच्या रूपातील बालकांचे सादरीकरण होते. दुसऱ्या दिवशी राम जन्म व राम वनवास, तिसऱ्या दिवशी सीतेचा शोध आणि अंगदाची लंकेतली शिष्टाई, चौथ्या दिवशी रावणवध व बिभीषणाचा राज्याभिषेक सादर केला जातो.
पाचव्या दिवशी सीतेची अग्निपरीक्षा, लव-कुश जन्म व भरतसोबत लव-कुश यांचे युद्ध दाखवले जाते. यानंतर महादेव, चंद्र, सूर्य व भवानी या अवतारांचे दर्शन आणि महिषासुर वधाचे सादरीकरण होते. हा सारा कार्यक्रम पहाटे पाच वाजेपर्यंत रंगतो. त्यानंतर भक्त प्रल्हाद आणि नरसिंह अवताराचे दर्शन होते. सोनवद बु. आणि सोनवद खु. या दोन्ही गावांमध्ये कलाकार घरोघरी जाऊन आरतीसाठी हजेरी लावतात.
या अनोख्या परंपरेत आजही वयोवृद्ध मंडळी आणि लहान बालकांचा सहभाग तितकाच लक्षणीय आहे. गावाबाहेर गेलेले ग्रामस्थ आणि सासुरवाशीन मंडळीही खास या रामलीलासाठी गावी परत येतात. 'वन्हे' हे सादरीकरण केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, गावाच्या सांस्कृतिक जिवंततेचे प्रतीक बनले आहे.

No comments