किसान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न पारोळा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
किसान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न
पारोळा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पारोळा:संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासभेने घोषित केलेल्या “ आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन व त्यांच्या अवैध तस्करीविरोधी दिन" चे औचित्य साधून किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पारोळा येथील राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे “नशामुक्त भारत पखवडा” निमित्त जनजागृतीपर शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावून देणे व समाजात नशामुक्तीची जाणीव निर्माण करणे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने झाली. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक परिणाम विषद करताना सांगितले की, “एक सुशिक्षित युवा पिढीच समाज व राष्ट्राची खरी शक्ती असते. अंमली पदार्थांचे व्यसन हे केवळ वैयक्तिक आयुष्याचे नव्हे तर कुटुंब, समाज व राष्ट्राचेही नुकसान करणारे आहे. त्यामुळे सर्वांनी ठामपणे या सवयीपासून दूर राहणे गरजेचे आहे.”
कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयातील सर्व उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे ‘नशामुक्त भारत’ घडविण्याची शपथ घेतली. शपथविधीचे संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. काकासाहेब गायकवाड यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना नशेच्या आहारी जाण्याचे विविध मानसिक व सामाजिक कारणे समजावून देत त्यांच्यात सुदृढ जीवनशैलीविषयी जागरूकता निर्माण केली.
या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे,आयक्यूसी समन्वयक डॉ. दिपक सांळुखे ,सर्व विभागप्रमुख, आणि स्वयंसेवक उपस्थित होते. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. शशिकांत पाटील यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

No comments