रेल्वे लाईनसाठी जमीन अधिग्रहणास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध ! उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलं निवेदन रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हे...
रेल्वे लाईनसाठी जमीन अधिग्रहणास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध ! उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलं निवेदन
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भुसावळ-खंडवा तिसरी व चौथी रेल्वे लाईन प्रकल्पासाठी शेतजमिनींचे अधिग्रहण सुरू असून, याला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी फैजपूर यांना निवेदन सादर केले.
काय आहे शेतकऱ्यांचा आक्षेप?
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, या प्रकल्पासाठी ज्या जमिनींचे अधिग्रहण करण्यात येत आहे त्या रेल्वे अधिनियम 1989 सुधारणा 2008 च्या आधारे बेकायदेशीरपणे करण्यात येत आहेत. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, भूसंपादन हे केवळ 'भुमी अधिग्रहण कायदा 2013' नुसारच करण्यात यावे आणि त्यानुसारच न्याय्य मोबदला मिळावा. या जमिनी काळी, कसदार व बागायती पिकांच्या असून, त्यांचे मूल्यही अधिक आहे. त्यामुळे मोबदला ठरवताना अद्ययावत रेडी रेकनर दराचा आधार घेण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
जमिनीच्या मोजणीमध्ये तफावत !
शेतकऱ्यांनी दावा केला की, राजपत्रात दर्शविलेल्या क्षेत्रफळ आणि प्रत्यक्ष संपादीत होणाऱ्या जमिनीमध्ये मोठी तफावत आहे. प्रत्यक्षात जास्त जमीन घेतली जात असून, नोटिफिकेशनमध्ये ती कमी दाखवण्यात आली आहे. त्यामुळे शेतजमिनीची मोजणी शेतकऱ्यांच्या समक्ष करूनच दुरुस्ती करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
या निवेदन प्रसंगी खालील मान्यवर उपस्थित होतेः
डिगंबर चौधरी - तंटामुक्ती अध्यक्ष, निंभोरा बु., अधिवक्ता अतुल चौधरी, प्रमोद कोंडे - माजी पं.स. सदस्य, रावेर , सतीश पाटील - ग्रामपंचायत सदस्य, प्रमोद चौधरी, हरेश्वर चौधरी व अन्य भागातील शेतकरी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे कायदेशीर प्रक्रिया राबवण्याची आणि संपूर्ण मोबदला देण्याची मागणी करत आपल्या हक्कांसाठी आवाज बुलंद केला आहे. प्रशासन यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

No comments