अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील १० हजारांपेक्षा अधिक घरांमध्ये होणार शाडू मातीच्या गणेश मूर्तींची स्थापना..कार्यशाळेच्या उपक...
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील १० हजारांपेक्षा अधिक घरांमध्ये होणार शाडू मातीच्या गणेश मूर्तींची स्थापना..कार्यशाळेच्या उपक्रमाला विश्वविक्रमासाठी मिळाले नामांकन..उपक्रमात सहभागी होणाऱ्या शाळा महाविद्यालयांचा होणार गौरव : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२६):-अहिल्यानगर महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेस प्रतिसाद देत महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत शहरातील दहा हजारांपेक्षा अधिक घरांमध्ये शाडू मातीच्या गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे. शहरातील शेकडो शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी अहिल्यानगर महानगरपालिका व पर्यावरणदूत, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आयोजित कार्यशाळांमध्ये शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवल्या. उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या उपक्रमाला विश्वविक्रमासाठी नामांकन मिळाले आहे.महानगरपालिकेच्या वतीने सर्व शाळांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या पुढाकार व मार्गदर्शनातून पर्यावरण पूरक गणेशोत्सव संकल्पना व उपक्रम शहरात राबविण्यात आले. यात पर्यावरण दूत डॉ. अमोल बागुल, बालाजी वल्लाळ, सतीश गुगळे तसेच विविध सामाजिक स्वयंसेवी संस्था, संघटना आदींनी हजारो विद्यार्थ्यांना शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्यासाठी कार्यशाळेतून प्रोत्साहन दिले. या सर्व शाळा महाविद्यालय व सामाजिक संस्थांचा महानगरपालिकेच्या वतीने गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे म्हणाले की, या संकल्पनेमुळे गणेशोत्सव निश्चितच पर्यावरणासाठी प्रेरक ठरणार आहे. शाडू मातीची मूर्ती वापरू या, नैसर्गिक रंगांचा वापर करू या, पीओपी आणि प्लास्टिक ला नाही म्हणू या, कृत्रिम विसर्जन टाक्यांचा उपयोग करू या.. या चतु:सूत्रीमुळे माझी वसुंधरा अभियानाचा उद्देश व उद्दिष्टही सफल होणार आहे. शहरांतील विविध माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक, तसेच महाविद्यालयांनी अभियानात सहभाग घेतला. उपक्रमासाठी विविध शाळा, महाविद्यालयांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, प्राध्यापक, पालक, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. उपक्रमासाठी महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाने परिश्रम घेतले.

No comments