महाविद्यालयातील सोयी सुविधांचा सुयोग्य वापर करून जीवनात मोठे व्हा - प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत ...
महाविद्यालयातील सोयी सुविधांचा सुयोग्य वापर करून जीवनात मोठे व्हा - प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आयुष्य अनमोल असून शिक्षणातून सर्वांग समृद्धता प्राप्त होत असते. पदवी, ज्ञान व कौशल्य विकसनातून जीवनात अनेकोत्तम सुसंधी लाभत असून धनाजी नाना महाविद्यालयासारख्या उच्च शिक्षणासाठी सर्वोत्तम पर्याय असणाऱ्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा विभाग, विद्यार्थी विकास विभाग व सुसज्ज ग्रंथालयाचा सुयोग्य वापर करून विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे व्हावे असा सल्ला प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांनी दिला. ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्राचार्य संबोधन सभेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ मनोहर सुरवाडे, उपप्राचार्य प्रा डॉ कल्पना पाटील, कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत एनसीसी अधिकारी, प्रा डॉ सतीश पाटील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी, प्रा डॉ विजय सोनजे विद्यार्थी विकास अधिकारी, प्रा डॉ गोविंदराव मारताळे संचालक क्रीडा विभाग, प्रा डॉ आई जी गायकवाड ग्रंथपाल यांच्यासहित प्राध्यापक व प्रथम वर्ष कला आणि प्रथम वर्ष वाणिज्य वर्गातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या ऐतिहासिक समृद्ध वारशाची माहिती व्हावी, कर्मयोगी धनाजी नाना चौधरी, बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या कार्याची ओळख व्हावी यासहित विविध पुरस्कार प्राप्त महाविद्यालयातील सुसज्ज विभागांचा विद्यार्थ्यांनी यथायोग्य सद्गपयोग करावा या हेतूने प्राचार्य संबोधन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांनी विद्यार्थी व विविध विभाग अधिकारी यांच्यात मुक्त संवाद घडवून आणला. यासहित विद्यार्थ्यांनी अध्ययन अध्यापनासोबतच विविध क्षेत्रात सुप्त कलागुणांचा विकास करावा व स्वतःचे व महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

No comments