चोपडा येथील रूपेश अहिरे यांनी विधी पदवी संपादन करून मिळवली उल्लेखनीय कामगिरी चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा : कठोर परिश...
चोपडा येथील रूपेश अहिरे यांनी विधी पदवी संपादन करून मिळवली उल्लेखनीय कामगिरी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा : कठोर परिश्रम, शिक्षणाविषयीची ओढ आणि कुटुंबीयांचे प्रेरणादायी संस्कार यांच्या जोरावर मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक म्हणून कार्यरत असलेले रूपेश गोपाल अहिरे यांनी अलीकडेच मुंबई विद्यापीठातून विधी पदवी (LL.B.) संपादन केली आहे. या यशामुळे अहिरे हे आपल्या परिवारातील पहिले विधी पदवीधर ठरले असून त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल समाजबांधव, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात आहे.
सन 2015 मध्ये शिपाई म्हणून न्यायालयीन सेवेत दाखल झालेल्या रूपेश अहिरे यांनी कार्यालयीन स्पर्धा परीक्षा आणि सेवा ज्येष्ठतेच्या आधारे लिपिक पदावर पदोन्नती मिळवली. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी D.Ed. (अध्यापक पदविका), B.A. (इंग्रजी) व M.A. (राज्यशास्त्र) या पदव्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर कायद्याच्या शिक्षणाची आवड जपत त्यांनी सातत्याने परिश्रम घेत विधी पदवी संपादन केली.
त्यांचे वडील श्री. गोपाल नारायण अहिरे हे भारतीय सैन्यात कार्यरत राहून सेवानिवृत्त झाले असून सैनिकी शिस्त, कर्तव्यनिष्ठा व मूल्यांचे संस्कार रूपेश यांच्या व्यक्तिमत्त्वात स्पष्टपणे दिसून येतात.
रूपेश अहिरे यांचा शिस्तबद्ध स्वभाव, संयम आणि शिक्षणाबद्दलची तळमळ हे गुण तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. न्यायालयीन सेवेत कार्यरत राहून त्यांनी सातत्याने केलेल्या परिश्रमांचा व शैक्षणिक ध्यासाचा आदर्श प्रत्येक तरुणाने घ्यावा, असे मत समाजातील ज्येष्ठ व्यक्तींनी व्यक्त केले आहे. रूपेश अहिरे यांच्या पुढील कारकिर्दीसाठी विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या यशोगाथेने समाजातील युवकांना नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments