उद्योजक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांची समृद्धी शक्य- मा. कुर्बान तडवी. इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पारंपारिक शेती पद्धती,...
उद्योजक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांची समृद्धी शक्य- मा. कुर्बान तडवी.
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पारंपारिक शेती पद्धती, हवामानातील अनियमितता, रासायनिक खतांचा अयोग्य व अवाजवी वापर यासहितच आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभावाने भूमिपुत्रांची परवड होताना दिसते. समाजाचा व देशाचा कणखर कणा म्हणून शेतकऱ्यांनी अल्पसंतृष्टीपणा बाजूला ठेवून उद्योजकेकडे वळले पाहिजे, आर्थिक अडसर बाजूला सारून पुरवठा साखळीतील दरी कमी करून सहभाग वाढवल्यास शेतकऱ्यांची भरभराट सहज शक्य असल्याचे प्रतिपादन कुर्बान तडवी, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, जळगाव यांनी केले. ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय शेतकरी तंत्रज्ञान साक्षरता कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष तथा तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रा डॉ सुधाकर काशिनाथ चौधरी यांच्यासहित श्री धनंजय चौधरी सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस, व्हॉईस चेअरमन प्रा किशोर रामदास चौधरी, व्यवस्थापन मंडळ सदस्य माजी प्राचार्य डॉ जी पी पाटील, श्री अजित पाटील सचिव, सातपुडा विकास मंडळ, पाल, श्री सुधाकर झोपे माजी मुख्याध्यापक, आश्रम शाळा, लोहारा, श्री सचिन गायकवाड मंडळ कृषी अधिकारी, डॉ महेश महाजन, डॉ धीरज नेहते, श्री अतुल पाटील, प्राचार्य डॉ आर वाय चौधरी, प्राचार्य डॉ आर एल चौधरी, प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे, प्रा डॉ पी डी पाटील अधीसभा सदस्य, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, उपप्राचार्य तथा गणित विभाग प्रमुख प्रा डॉ. हरीश नेमाडे आदी मान्यवर उपस्थित होते. शेतकरी तंत्रज्ञान साक्षरता कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांनी केले. त्यात त्यांनी ग्रामव्यवस्था व कृषी समाज रचनेचा कणा असणाऱ्या शेतकरी राजाला एकाच वेळी नापिकी ओला दुष्काळ, वादळ, वारा यांच्यासहित मजुरांची समस्या, खतांची अनुउपलब्धता व विविध कीड रोग व्यवस्थापनाला शी संघर्ष करताना दमछाक होत असते. या जगाच्या पोशिंदाला खर्च कमी करून उत्पादन जास्त मिळावे, पारंपरिक कृषी क्षेत्रा सोबतच तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकरी तंत्रज्ञान साक्षरता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून स्वर्गीय बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या जल व्यवस्थापन व भूमिपुत्रांसाठी केलेल्या कार्याच्या आठवणींना उजाळा देत अशा प्रकारच्या कार्यशाळा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायी असल्याचे मत व्यक्त केले. विद्यापीठाने कार्यशाळेला मान्यता दिल्याबद्दल माननीय कुलगुरू व संबंधित विभाग कक्षाधिकारी यांचे आभार व्यक्त केले. प्रथम सत्रात सचिन गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी यांनी जय जवान, जय किसान, जय विज्ञान, या सहित जय अनुसंधान या चतुरसूत्रीचा उल्लेख करून एग्रीकल्चर या शब्दांमध्येच कल्चर असून शेतकरी जीवन समृद्ध करणे शासनाचे प्रथम उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन करून शेतकऱ्यांनी शेततळे योजना, गोदाम योजना यांच्यासहित शासनाच्या विविध योजनांचा सुयोग्य उपयोग करून घ्यावा यासोबतच महाविस्तार ॲपच्या माध्यमातून तंत्रज्ञानाला सोबत घेऊन उत्पादन वाढी वरती भर द्यावा असे मत व्यक्त केले. यावेळी श्री धनंजय चौधरी सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचा ऊहापोह करीत शेतकरी आणि शासन यांच्यात समन्वय साधून शेतकरी हिताच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात अशी अपेक्षा करीत सदर कार्यशाळेच्या माध्यमातून एक स्तुत्य सुरुवात झाल्याचा मनोदय व्यक्त केला.कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचलन कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले तर आभार कार्यशाळेचे समन्वयक प्रा डॉ निखिल वायकोळे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिरीषदादा चौधरी यांच्यासहित सर्व सन्माननीय संस्था पदाधिकारी महोदयांच्या शुभेच्छा लाभल्या असून प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे, सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments