लासूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी; लेझीम व ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायक...
लासूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी; लेझीम व ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक
विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लासूर ता. चोपडा येथे मराठा समाज सुधारणा विकास मंडळ व गावातील सर्व संस्थांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली.
संध्याकाळी पाच वाजता बाजार चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते मल्ल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर बाजार चौकातील मंडपात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सरपंच नर्मदाबाई भिल यांनी पुष्पहार अर्पण केला. पुढे गावातील विविध संस्था व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमास चोपडा सुतगिरणीचे संचालक अमृतराव वाघ, किसान विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील व सचिव विक्रम माळी, विकास सोसायटीचे चेअरमन योगेश वाघ, श्री नाटेश्वर पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन संजय पाटील, संजय पालीवाल, श्री संत सावता महाराज पतसंस्थेचे चेअरमन प्रा. हिम्मतराव माळी, कोळी महासंघाचे कैलास बाविस्कर, शंकर महाजन, गट सचिव संघाचे संचालक विजय पाटील, तुकाराम महाजन, ह.भ.प. बापू महाराज, प्रकाश पाटील, पत्रकार आत्माराम पाटील, अजय पालीवाल, लीलाधर पाटील, सुनील वाघ, गोकुळ भाऊसाहेब, कैलास महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठा समाज सुधारणा विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या मुलींच्या लेझीम पथकाने उत्कृष्ट संचलन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
शिवाजीनगर येथील बाबुराव वाघ चौकात गावातील प्रसिद्ध ताशा वादक बिस्मिल्ला खान यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक एकात्मतेचा संदेश देत शिवरायांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.
यानंतर गावातून लेझीम पथक व ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सर्व संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे आणि शिवमय वातावरण निर्माण झाले होते.

No comments