विराट मल्टिपर्पज फाऊंडेशनची दिव्यांग प्रवासी सवलत योजने विरोधात मुख्यमंत्र्यांना मागणी पल्लवी पाटील खामगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) खाम...
विराट मल्टिपर्पज फाऊंडेशनची दिव्यांग प्रवासी सवलत योजने विरोधात मुख्यमंत्र्यांना मागणी
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खामगाव:- विराट मल्टिपर्पज फाऊंडेशन (दिव्यांग सेवाभावी संस्था) यांच्या वतीने राज्यातील दिव्यांग नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या संगणकीकृत प्रवास ओळखपत्र योजनेबाबत आक्षेप नोंदवत मा. मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींना नव्याने स्वतंत्र ओळखपत्र काढणे बंधनकारक करू नये व केंद्र शासनाच्या एकसंध दिव्यांग ओळखपत्रावरच प्रवास सवलत द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्य मार्ग परिवहन महामंडळ बस प्रवासासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी आदी घटकांना सवलती देते. मात्र दिव्यांग व्यक्तींना सवलत मिळविण्यासाठी नव्याने संगणकीकृत ओळखपत्र काढणे आवश्यक करण्यात येत असल्याने त्यांच्यावर आर्थिक भार पडत आहे. ओळखपत्रासाठी आकारण्यात येणारे शुल्क तसेच त्यातील रकमेची आगाऊ भर घालण्याची अट ही दिव्यांग नागरिकांसाठी जाचक ठरत असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.
दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्र शासनामार्फत आधीच एकसंध ओळखपत्र प्रणाली अस्तित्वात आहे. त्याच आधारे प्रवास सवलत देणे शक्य असताना स्वतंत्र ओळखपत्र योजना राबविणे हे दिव्यांग हक्क कायद्याच्या भावनेला बाधक असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
संस्थेचे अध्यक्ष मनोज नगरनाईक यांनी सांगितले की, अनेक दिव्यांग नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. वारंवार ओळखपत्र काढणे व त्यासाठी शुल्क भरणे हे त्यांच्यासाठी अन्यायकारक आहे. शासनाने मानवतावादी दृष्टीकोन स्वीकारून दिव्यांग घटकांना या नव्या प्रक्रियेतून सूट द्यावी किंवा विद्यमान शासकीय ओळखपत्रालाच मान्यता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सदर निवेदनाची प्रत परिवहन मंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आली असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

No comments