*शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, राज्य सरकारकडून दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा..* *अमोल बावस्कार बुलडाणा प्रतिनिधी * (संपादक :- हेमकांत गायकव...
*शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, राज्य सरकारकडून दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा..*
*अमोल बावस्कार बुलडाणा प्रतिनिधी *
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
*बुलढाणा-* राज्यातील बळीराजाला दिलासा देण्यासाठी अखेर राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी माजी राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या नेतृत्वात राज्यातील विविध शेतकरी नेत्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अंतर्गत दि. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफ करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल अशी घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील शेतकरी प्रश्नांवर माजी राज्यमंत्री बच्चु कडू यांच्यासह विजय जावंधिया, राजू शेट्टी, महादेव जानकर, डॉ. अजित नवले, वामनराव चटप, दिपक केदार, प्रशांत डिक्कर, गजानन बंगाळे, प्रकाश पोहरे, आणि विठ्ठलराजे पवार यांसारख्या दिग्गज नेत्यांनी सातत्याने आवाज उठवला होता. या सर्व नेत्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरून सरकारला धारेवर धरले होते. यांच्या आंदोलनांच्या दबावामुळे अखेर सरकारला हा ऐतिहासिक निर्णय घ्यावा लागला आहे.
काय आहे घोषणा?
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार, ज्या शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज थकीत आहे, त्यांचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाणार आहे. यामुळे राज्यातील लाखो अल्पभूधारक आणि गरजू शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या सातबारा उताऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी होणार आहे. तरी ही कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शक आणि विनाविलंब असावी, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ ही कर्जमाफी पुरेशी नसून, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा व शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी लढा सुरूच राहील, असा निर्धारही या नेत्यांनी व्यक्त केला आहे...

No comments