सक्षमरत्न पुरस्काराने रमेश जे. पाटील यांचा गौरव चंद्रकांत पाटील विचखेडा/ नाशिक प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:- तालुक्याती...
सक्षमरत्न पुरस्काराने रमेश जे. पाटील यांचा गौरव
चंद्रकांत पाटील विचखेडा/ नाशिक प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- तालुक्यातील आडगाव येथील ज्येष्ठ पत्रकार, कवी, लेखक व साहित्यिक रमेश जे. पाटील यांना सक्षमरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हनुमान जयंतीच्या निमित्ताने नाशिक येथे सक्षम पोलीस टाइम्स वृत्तपत्रातर्फे आयोजित कार्यक्रमात त्यांना सन्मानचिन्ह, शाल व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
नाशिक येथील अशोका समूहाच्या द इन्स्टिट्यूट ऑफ करिअर हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर त्र्यंबकेश्वर येथील आदिनाथ आखाड्याचे पिठाधीश्वर योगी विश्वनाथ बाबाजी, सक्षम पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक विलास पाटील, निवासी संपादक मनोहर अहिरे तसेच स्थानिक नगरसेविका उपस्थित होत्या.
या सोहळ्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पूजा माई नंदगिरी, शंकर मोठा बाबा भामरे, रामदास कुंदे, डॉ. सौ. मनीषा वाघ यांचा समावेश होता. तसेच कार्यकुशल धुरंदर पुरस्कार अंतर्गत नित्यानंद पाटील, संजय मिरे, डॉ. तुकाराम गवळी, संतोष कांबळे आणि नाशिक जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष योगेश तिडके यांचाही गौरव करण्यात आला.
प्रास्ताविकात बोलताना विलास पाटील यांनी सांगितले की, सक्षम पोलीस टाइम्स हे केवळ वृत्तपत्र नसून एक सामाजिक चळवळ आहे. पोलिसांच्या हितासाठी काम करत असताना समाजातील गुणवंत व्यक्तींना शोधून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आम्ही जोपासत आहोत. कोणत्याही प्रकारचा आर्थिक मोबदला न घेता हे उपक्रम राबवले जातात, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनोहर अहिरे यांनी केले. सायंकाळच्या सुमारास झालेल्या हलक्या पावसामुळे आणि संगीतमय वातावरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली होती.

No comments