निलंग्यात ‘हप्त्यांचा खेळ’ उघड! व्हायरल व्हिडिओमुळे दारूबंदी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप. लातूर, जि, प्र. (उत्तम माने ) (संपादक -:- हेमकांत गा...
निलंग्यात ‘हप्त्यांचा खेळ’ उघड! व्हायरल व्हिडिओमुळे दारूबंदी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप.
लातूर, जि, प्र. (उत्तम माने )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
निलंगा व देवणी तालुक्यातील परिसरात अवैध दारू विक्रीचा काळाबाजार दिवसेंदिवस बळावत चालला असून, यामागेच एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण समोर आले आहे. दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनाच महिन्याला “तीन हजारांचा हप्ता” दिला जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक अवैध दारू विक्रेत्यांकडून उघड झाला आहे. यात आणखी भर म्हणजे, या संपूर्ण प्रकाराचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये अवैध व्यवहार आणि ‘मंथली’बाबतच्या चर्चेचे दृश्य असल्याचा दावा केला जात असून, त्यामुळे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकारी कारवाईसाठी निलंगा परिसरात दाखल झाले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई न करता ते परत फिरल्याची चर्चा जोर धरत आहे. यामागेच ‘मंथली’चा खेळ असल्याचा आरोप उघडकीस आला असून, यामुळे संपूर्ण यंत्रणेच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिकांच्या मते, अवैध दारू विक्री खुलेआम सुरू असूनही प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे. “महिन्याचा हप्ता वेळेवर पोहोचला की कारवाई थांबते,” असा थेट आरोप विक्रेत्यांनीच केल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. दरम्यान, या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. जर आरोप खरे ठरले, तर ही केवळ भ्रष्टाचाराची बाब नसून, संपूर्ण दारूबंदी मोहिमेवरच काळा डाग ठरणार आहे. निलंगा परिसरातील हा “हप्त्यांचा खेळ” आणि त्याचा व्हायरल व्हिडिओ उघडकीस आल्याने प्रशासन हादरले असून, आता वरिष्ठ अधिकारी याकडे किती गांभीर्याने पाहतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

No comments