गोदरेज कंपनीच्या मालाची अफरातफर उघड..एमआयडीसीतून 2.77 लाखांचा मुद्देमाल लंपास.. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ठोकल्या बेड्या सचिन...
गोदरेज कंपनीच्या मालाची अफरातफर उघड..एमआयडीसीतून 2.77 लाखांचा मुद्देमाल लंपास.. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ठोकल्या बेड्या
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:-एमआयडीसी परिसरातील गोदरेज कंपनीच्या मालाची अफरातफर करून परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून मोठा गैरव्यवहार उघडकीस आणला आहे. सुमारे 2 लाख 77 हजार 311 रुपयांच्या मुद्देमालाचा अपहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी वैभव चंद्रकांत मचाले (वय 45, रा. आनंदनगर हौसिंग सोसायटी, गुलमोहर रोड, अहिल्यानगर) यांच्या ताब्यातील वडगाव गुप्ता शिवारातील गोडावूनमधील गोदरेज कंपनीचा माल दिनांक 1 जानेवारी 2026 ते 7 फेब्रुवारी 2026 दरम्यान अफरातफर करण्यात आला.
या प्रकरणात गोदरेज कंपनीचे व्हॅन सेल्स प्रतिनिधी अंबादास शंकर दराडे (रा. सांगवी खुर्द, ता. पाथर्डी) व वाहन चालक देविदास तुकाराम साबळे (रा. शेकटे, ता. पाथर्डी) यांनी त्यांच्या ताब्यातील वाहनातून माल वेळोवेळी घेऊन जाऊन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या हेतूने त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचे समोर आले आहे.
सदर घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र. नं. 222/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 306, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान,पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली सपोनि हरीष भोये व त्यांच्या पथकाने कसून तपास सुरू केला.गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढत पोलिसांनी प्रथम सांगवी खुर्द येथून अंबादास दराडे याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या सांगण्यावरून शेकटे गावातून देविदास साबळे यालाही अटक करण्यात आली.
दोन्ही आरोपींनी चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली असून, जिल्ह्यातील गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

No comments