अहमदनगर कॉलेजमध्ये राडा..! 'मी कॉलेजचा भाई आहे' म्हणत विद्यार्थ्याला बेदम मारहाण.. चौघांविरुद्ध गुन्हा दाखल सचिन मोकळं अहिल्यानगर...
अहमदनगर कॉलेजमध्ये राडा..! 'मी कॉलेजचा भाई आहे' म्हणत विद्यार्थ्याला बेदम मारहाण.. चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :-शहरातील प्रतिष्ठित अहमदनगर कॉलेजच्या परिसरात शनिवारी दुपारी जोरदार राडा झाला. "मी कॉलेजचा भाई आहे, तू आमच्याकडे रागाने का बघतो?" असे म्हणत चार तरुणांनी एका १९ वर्षीय विद्यार्थ्याला लाकडी फळी आणि कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सार्थक हनुमंत जाधव (वय १९, रा. जामखेड, सध्या रा. शिक्षक कॉलनी) हा तरुण अहमदनगर कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. शनिवारी २५ एप्रिल रोजी त्याचा इंग्रजीचा पेपर होता. पेपर संपल्यानंतर दुपारी १:३० च्या सुमारास सार्थक आपल्या मित्रांसोबत कॅन्टीनमधून नाष्टा करून लेडीज हॉस्टेलजवळ आला असताना ही घटना घडली. आरोपी किरण खेडकर याने सार्थकला धक्का दिला. त्यानंतर काही वेळातच मुख्य इमारतीजवळ आरोपी आदित्य भिंगारदिवे, किरण खेडकर, सॅम पाटोळे आणि साहिल खोटे यांनी सार्थकला गाठले. "बाहेरचे येऊन आमच्या पोरांकडे रागाने काय बघतो, आम्ही इथले भाई आहोत," असे म्हणत त्यांनी शिवीगाळ सुरू केली.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपींनी लाकडी फळी, कमरेचा पट्टा आणि दगडाने सार्थकला बेदम मारहाण केली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या नितीन कांबळे या विद्यार्थ्यालाही आरोपींनी मारहाण केली. पोलिसांत गेल्यास बघून घेण्याची धमकी मारहाण केल्यानंतर आरोपींनी, "जर पोलीस स्टेशनला तक्रार दिली, तर उद्यापासून एकेकाची गाठ आहे," अशी धमकी देऊन तिथून पळ काढला. जखमी सार्थकला त्याच्या मित्रांनी तातडीने जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.सार्थक जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी १) आदित्य भिंगारदिवे (रा. भिंगार), २) किरण खेडकर (रा. पाथर्डी), ३) सॅम पाटोळे (रा. दरेवाडी) आणि ४) साहिल खोटे (रा. फरियाबाग) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बनकर करत आहेत.
No comments