रेबिज (सदरील लेखात अशोक हे नाव काल्पनिक वापरले असून या नावाचा या लेखातील व्यक्ती शी काही संबंध नाही) सातपुड...
रेबिज
(सदरील लेखात अशोक हे नाव काल्पनिक वापरले असून या नावाचा या लेखातील व्यक्ती शी काही संबंध नाही)
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या लासुर गावात मी माझे बालपणाचे आनंदी जीवन जगत होतो. माझ्या बरोबर गल्लीतलाच अशोक (सदरील लेखात नाव बदलेल आहे) हा सुद्धा इयत्ता चौथीत शिक्षण घेत होता. उन्हाळ्यात त्याने वर्षभर लागणारे सरपण पायपीट करून जंगलात जाऊन जमविले. एके दिवशी ओट्यावर तो खेळत असतांना पिसाळलेल्या श्वानाचा पंजा तोंडावर लागला. फक्त ओरखडा असल्याने आई बाबांनी दुर्लक्ष केले . धेल्याला(जुन्या काळातील पैसा) चुना लाऊन उपचार केले. पावसाळा सुरु झाला आणि अशोकला त्रास जाणवू लागला. मग औषधोपचारासाठी पळापळ सुरु झाली. डॉक्टरांनी सांगितले की त्याच वेळेला सरकारी हॉस्पिटलमध्ये जावून रेबिज प्रतिबंधक इंजेक्शन घेणे आवश्यक होते. आता पश्चाताप करून काहीच साध्य होणार नव्हते अशोक पिसाळल्या सारखा करु लागला. आणि तो हे जग सोडून गेला. मी कालांतराने शिक्षण घेऊन शिक्षक झालो. मी जेव्हा नोकरी करत असताना सुट्टीत गावाला म्हणजे लासुरला येई तेव्हा मला पाहून अशोकच्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा असतं. बऱ्याचदा मला ते जवळ बोलवत आणि सांगत आता तुझ्या एवढाच राहिला असता आमचा अशोक. माझ्यात ते अशोकला शोधण्याचा जणू ते प्रयत्न करत.. अशा शेकडो घटना पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे होत असतात. त्यासाठी योग्य वेळीच प्रतिबंधक इंजेक्शन घेणे जरुरीचे असते. आजार झाल्यावर उपचार नाहीच तरी योग्य खबरदारी घ्यावी असे सुचवावेसे वाटते या आजाराबाबत मार्गदर्शन उपचार मी शिक्षक असल्यामुळे दरवर्षी हायड्रोफोबिया या आजारा बाबत काय खबरदारी घ्यावी यांचे मार्गदर्शन केले आहे. योग्य वेळी योग्य उपचार होणे हे आवश्यक असते. त्याचबरोबर खबरदारी घेणे आवश्यक आहे.
अब्दुल सरदार पटेल
मो. 9823114236

No comments