adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

छाटणीच्या नावाखाली मोठ्या वृक्षांची तोड. चौगाव-लासूर रस्त्यावर फांद्या छाटण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षांची तोड; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

  छाटणीच्या नावाखाली मोठ्या वृक्षांची तोड. चौगाव-लासूर रस्त्यावर फांद्या छाटण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षांची तोड; प्रशासनाच्या भ...

 छाटणीच्या नावाखाली मोठ्या वृक्षांची तोड.

चौगाव-लासूर रस्त्यावर फांद्या छाटण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षांची तोड; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह



चौगाव / प्रतिनिधी – विश्राम तेले

(संपादक : हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुक्यातील चौगाव-लासूर रस्त्यावर सौर ऊर्जा प्रकल्पासाठी इलेक्ट्रिक पोल उभारण्याचे काम सुरू असून, या कामादरम्यान झाडांच्या फांद्या अडथळा ठरत असल्याचे कारण देत मोठ्या प्रमाणावर निंबाच्या झाडांच्या फांद्या मशीनच्या सहाय्याने तोडल्या जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिकांच्या मते, फांद्या छाटण्याऐवजी मोठमोठ्या फांद्या निर्दयपणे तोडल्या जात असून अनेक झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, संबंधित अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रिक पोल उभारताना रस्त्यालगत असलेली भलीमोठी झाडे आधीच पाहिली नव्हती का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूंना १२ मीटर अंतरात अडथळा निर्माण करणारे पोल उभारू नयेत, असा नियम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सौर ऊर्जा विभागाने पोल उभारण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाची आवश्यक परवानगी घेतली होती का? तसेच परवानगी घेतली असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना ही झाडे दिसली नव्हती का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

“झाडांच्या फांद्या छाटण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षांची तोड सुरू आहे. हे सर्व कुणाच्या परवानगीने सुरू आहे? प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

एकीकडे शासन “झाडे लावा, झाडे जगवा” असा संदेश देत असताना दुसरीकडे वर्षानुवर्षे वाढलेल्या झाडांचा होत असलेला सत्यानाश दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

याबाबत वृक्षप्रेमींनी आणि सामाजिक संघटनांनी आवाज उठवण्याची गरज असल्याचे मत लासूर येथील पत्रकार आत्माराम पाटील यांनी व्यक्त केले आहे.

No comments