खामगावात तणावपूर्ण शांतता; निर्मल टर्निंगजवळ दगडफेक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पल्लवी पाटील खामगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) खामगाव शहर...
खामगावात तणावपूर्ण शांतता; निर्मल टर्निंगजवळ दगडफेक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खामगाव शहरातील निर्मल टर्निंग परिसरात बुधवारी रात्री अचानक दगडफेकीची घटना घडल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन गटांतील शाब्दिक वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल करण्यात आला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असल्याचे चित्र आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ९ वाजेच्या दरम्यान निर्मल टर्निंग परिसरात दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. काही वेळातच हा वाद चिघळत गेला आणि अज्ञातांकडून रस्त्यावर तसेच काही दुकानांवर दगडफेक करण्यात आली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक दुकानदारांनी तातडीने दुकाने बंद करून परिसर रिकामा केला.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाणे व शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच दंगा नियंत्रण पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्पर कारवाई करत जमावाला पांगवले व परिस्थिती नियंत्रणात आणली. परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. रॅपिड अॅक्शन फोर्सची मदतही मागवण्यात आल्याची माहिती आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. “परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणीही कायदा हातात घेऊ नये. समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.
दगडफेकीनंतर निर्मल टर्निंग व लगतच्या भागातील नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले असून मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पसरल्याचे दिसून येत आहे. दगडफेकीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हा प्रकार किरकोळ वादातून झाला की पूर्वनियोजित होता, याचा तपास पोलीस करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून संशयितांची ओळख पटवण्याचे काम वेगाने सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या अफवा, व्हिडिओ किंवा भडकाऊ संदेश फॉरवर्ड न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत निर्मल टर्निंग परिसरात अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने ११२ क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


No comments