‘माझी शाळा माझी आई’ थीमने विटनेर जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा सेल्फी पॉईंट ठरला पालकांचे आकर्षण; आई-शाळा-मुलांचे नाते अधि...
‘माझी शाळा माझी आई’ थीमने विटनेर जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
सेल्फी पॉईंट ठरला पालकांचे आकर्षण; आई-शाळा-मुलांचे नाते अधिक दृढ
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विटनेर (ता. चोपडा):- येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश शाळेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यंदा शाळेने ‘माझी शाळा माझी आई’ ही आगळीवेगळी संकल्पना राबवून नवागत विद्यार्थ्यांचे प्रेमाने स्वागत केले. या उपक्रमामागे आई, शाळा आणि विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सौ. कविता मंगल पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी विद्यार्थी संघाचे भावलाल कोळी, मंगल पाटील, किशोर कोळी, प्रवीण कोळी, पंकज कोळी (जळगाव), शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण कोळी तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. प्रवेशोत्सवाचे खास आकर्षण ठरला तो ‘सेल्फी पॉईंट’. विद्यार्थ्यांनी आपल्या आईसोबत येथे सेल्फी काढून शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आठवणी जपल्या. या उपक्रमामुळे पालकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक व कौशल्याधारित दालने उभारण्यात आली होती. आरोग्य व नोंदणी विभागात योगिता कोळी यांनी विद्यार्थ्यांची नोंदणी करून वजन व उंची मोजली. शारीरिक व कला कौशल्य विभागात हिराताई कोळी यांनी दोरीउड्या, चेंडू-रिंग फेक, कागदकाम व चित्रकला अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवला. बौद्धिक विकासासाठी कल्पनाताई कोळी यांनी वर्गीकरण, क्रम लावणे व तुलना यांसारख्या कृती घेतल्या, तर सामाजिक व भावनिक विकासासाठी मिराबाई पाटील यांनी संवादातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला. भाषा कौशल्य विभागात मनीषा पाटील यांनी चित्रवर्णन, कथाकथन व अक्षर ओळख करून दिली, तर गणित कौशल्य विभागात सुनिता पाटील यांनी आकार, अंक व गणन पूर्वतयारी शिकवली. श्री. विकास पाटील यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रवेश अर्ज व विकास पत्र भरण्याची जबाबदारी हेमंत पाटील यांनी पार पाडली. पालकांसाठी चहापानाची व्यवस्था प्रमिला कोळी व कल्पना कोळी यांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. प्रवीण पाटील यांनी समन्वय साधला, तर श्री. हेमंत भामरे यांनी विशेष मार्गदर्शन व परिश्रम घेतले. ‘माझी शाळा माझी आई’ या संकल्पनेमुळे शाळा आणि पालक यांच्यातील भावनिक नाते अधिक घट्ट झाले असून, प्रवेशोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

No comments