छत्रपती शिवाजी हायस्कूल, कठोरा येथे आषाढी एकादशी पालखी सोहळा उत्साहात संपन्न! अडावद | प्रतिनिधी संपादक : हेमकांत गायकवाड आषाढी एकादशीचे औच...
छत्रपती शिवाजी हायस्कूल, कठोरा येथे आषाढी एकादशी पालखी सोहळा उत्साहात संपन्न!
अडावद | प्रतिनिधी
संपादक : हेमकांत गायकवाड
आषाढी एकादशीचे औचित्य साधून चोपडा तालुक्यातील कठोरा येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शालेय पालखी सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषात आणि अभंगांच्या सुरावटीत संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक एस. पी. पाटील यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे तसेच पालखीचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत पालखी मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मुलांनी धोतर, कुर्ता, तुळशीची माळ आणि डोक्यावर तुळशी वृंदावन धारण केले होते, तर मुलींनी नऊवारी साडी परिधान करून वारकरी संस्कृतीचे आकर्षक दर्शन घडविले.
यानंतर शालेय दिंडी कठोरा गावातून मोठ्या उत्साहात काढण्यात आली. "ज्ञानबा-तुकाराम", "विठ्ठल विठ्ठल विठ्ठला" अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या तालावर अभंग गायन, फुगड्या आणि भक्तिगीते सादर करून वारकरी परंपरेचे जिवंत चित्र उभे केले. दिंडी मार्गावर ग्रामस्थांनी ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले तसेच विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांच्या उत्साहात भर घातली. या भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण गाव विठ्ठलनामाच्या गजरात दंग झाले होते. यावेळी मुख्याध्यापक एस. पी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व, वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा आणि संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या विचारांची माहिती दिली. शिक्षकांनीही अभंग, नामस्मरण आणि संस्कारमूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या पालखी सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार, सामाजिक ऐक्य आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेविषयी आदराची भावना अधिक दृढ झाल्याचे समाधान यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

No comments