कोकळगाव ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा ग्रामस्थांचा इशारा. लातूर, जि...
कोकळगाव ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा ग्रामस्थांचा इशारा.
लातूर, जि. प्र. (उत्तम माने )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
निलंगा : तालुक्यातील मौजे कोकळगाव ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा प्रचंड गैरवापर, कागदोपत्री कामे दाखवून भ्रष्टाचाराची गंगा वाहिल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी दोषी असणारे ग्रामसेवक, संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी समस्त कोकळगाव ग्रामस्थांच्या वतीने निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) यांना एक जाहीर निवेदन देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीत १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत कोकळगावच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, प्रत्यक्षात गावाचा विकास न होता केवळ कागदोपत्री खर्च दाखवून शासकीय निधीची सर्रास लूट करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
गावात पाणीपुरवठा, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधांच्या नावाखाली झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केल्यास बहुतांश कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची, अर्धवट अथवा केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याचे उघडकीस येत आहे. तांत्रिक व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ग्रामस्थांचा थेट आरोप आहे. १५ व्या वित्त आयोगातील सर्व कामांची जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरून तात्काळ स्वतंत्र चौकशी समिती नेमून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात यावी.
बोगस कामे दाखवून निधी लाटणाऱ्या संबंधित ग्रामसेवकाला व इतर जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.अपहार झालेली रक्कम दोषींच्या खिशातून वसूल करून त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
शासकीय निधीच्या उघडउघड अपहाराविरोधात कोकळगावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन पुढील ७ दिवसांच्या आत चौकशी समितीची स्थापना करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसे न झाल्यास निलंगा पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आमरण उपोषण व आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर गोविंद संभाजी गोडबोले, संजय व्यंकट उजने, वसंत माधवराव बिराजदार, लालामियां करीम शेख, मनोहर विनायक लामतुरे, किरण विठ्ठल उजने, अनिल निवृत्ती कामले, किशोर विलास आगलावे, संजय पंडित बिराजदार, लिंबराज माणिक उजने, श्रीमंत रामा मेहकरे, तुकाराम आनंदराव आगलावे, वैजनाथ मल्लिकार्जुन बिराजदार, मंगेश नागनाथ वागांना, संजय शिवमूर्ती लामतुरे, रमेश गोपाळ मेहकरे यांच्या सह्या आहेत.या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या सर्व कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस पंचायत समिती प्रशासनच पूर्णपणे जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद केले आहे.
सदर निवेदनाच्या प्रती लातूरचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनाही माहिती व पुढील कठोर कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या यापुढील भूमिकेकडे आता संपूर्ण निलंगा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments