"पीक विमा नावाचा पोपट मेला आहे" म्हणणाऱ्या कृषी अधिकारी संघटनेचे अभिनंदन; पण योजना बंद करण्याऐवजी सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्या –...
"पीक विमा नावाचा पोपट मेला आहे" म्हणणाऱ्या कृषी अधिकारी संघटनेचे अभिनंदन; पण योजना बंद करण्याऐवजी सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्या – एस. बी. नाना पाटील
तीन ट्रिगर रद्द झाल्याने पीक विमा योजनेचा मूळ उद्देश कमकुवत; महाभारतातील विदुराप्रमाणे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन
चोपडा प्रतिनिधी :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्य कृषी राजपत्रित अधिकारी संघटनेने कृषिमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात सध्याच्या पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे नमूद करत, नुकसानभरपाईसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) च्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. याबाबत शेतकरी कृती समितीचे नेते एस. बी. नाना पाटील यांनी प्रतिक्रिया देताना कृषी अधिकारी संघटनेचे अभिनंदन केले आहे. मात्र, पीक विमा योजना बंद करण्याचा सल्ला देण्याऐवजी ती अधिक प्रभावी आणि शेतकरीहिताची करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
एस. बी. नाना पाटील यांनी म्हटले की, "पीक विमा नावाचा पोपट मेला आहे, हे सांगण्याचे धाडस कृषी अधिकारी संघटनेने केले, त्यांचे स्वागत आहे. मात्र, योजना बंद करण्याची मागणी करण्याऐवजी हा 'पोपट' तीन ट्रिगर रद्द केल्यामुळेच मेला आहे, हे सरकारसमोर ठामपणे मांडणे आवश्यक आहे."
त्यांच्या म्हणण्यानुसार, देशभर लागू असलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेत सुरुवातीला चार ट्रिगरची व्यवस्था होती. मात्र महाराष्ट्रात त्यापैकी तीन महत्त्वाचे ट्रिगर रद्द करण्यात आल्याने योजनेचा मूळ उद्देशच कमकुवत झाला आहे. त्यामुळे सध्याची योजना अनेक बाबतीत NDRF आणि SDRF च्या निकषांपेक्षाही कमी प्रभावी ठरत असल्याचा दावा त्यांनी केला.
नाना पाटील यांनी जळगाव जिल्ह्याचे उदाहरण देताना सांगितले की, गेल्या वर्षी सुमारे तीन लाख शेतकऱ्यांनी ४० टक्के क्षेत्रावरील पिकांसाठी तब्बल १६ कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला. मात्र त्यांना अत्यल्प नुकसानभरपाई मिळाल्याचे समोर आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात सहभाग असूनही अपेक्षित लाभ मिळत नसेल, तर योजनेच्या निकषांमध्येच गंभीर त्रुटी असल्याचे स्पष्ट होते, असे त्यांनी नमूद केले.
त्यांनी विमा कंपन्यांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, काही विमा कंपन्या मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा आरोप केला. तसेच या संदर्भात अधिकारी आणि लोकप्रतिनिधी प्रभावी भूमिका घेत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार कोणतेही असो, शेतकरी हिताच्या योजनांना कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त करत, पीक विमा योजना बंद करण्याऐवजी ती अधिक पारदर्शक, न्याय्य आणि शेतकरीहिताची करण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. शेवटी त्यांनी महाभारतातील विदुराचे उदाहरण देत कृषी अधिकारी संघटनेला आवाहन केले की, "धूर्त लोकांनी लावलेल्या आगीत शेतकरी होरपळत आहे. अशा वेळी महाभारतातील विदुराप्रमाणे पुढे येऊन पीक विमा योजना अधिक सक्षम, न्याय्य आणि शेतकरीहिताची करण्यासाठी प्रयत्न करा. शेतकऱ्यांना वाचविण्याची हीच खरी वेळ आहे."

No comments