अहिल्यानगर मध्ये 'भाईगिरी'चा द END ? एकाच छताखाली २२० खतरनाक गुन्हेगार..एसपी सुदर्शन यांचा इशारा.. सचिन मोकळं अहिल्यानगर (संपाद...
अहिल्यानगर मध्ये 'भाईगिरी'चा द END ? एकाच छताखाली २२० खतरनाक गुन्हेगार..एसपी सुदर्शन यांचा इशारा..
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत वाढलेली गुन्हेगारी,भाईगिरी आणि गँगवारचा बिमोड करण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि थरारक मोहीम हाती घेतली आहे. दक्षिण विभागातील तब्बल २२० अट्टल आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांना एकाच वेळी पोलीस मुख्यालयात एकत्र आणून त्यांचे 'विशेष समुपदेशन' करण्यात आले. मात्र,हे केवळ समुपदेशन नसून गुन्हेगारी जगताला दिलेला हा अखेरचा इशारा असल्याचा कडक संदेश पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.या कारवाईमुळे जिल्ह्यातील भाई आणि गुंड प्रवृत्तीचे धाबे दणाणले आहेत.पोलीस मुख्यालय येथे जमलेल्या २२० गंभीर गुन्हेगारांना संबोधित करताना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत सुनावले.
"शहरात किंवा जिल्ह्यात भाईगिरी,गँगवार,खंडणी, मारामारी,दहशत निर्माण करणे किंवा शस्त्रांचा बेकायदेशीर वापर अजिबात खपवून घेतला जाणार नाही.जर कायद्याच्या चौकटीबाहेर पाऊल टाकले, तर परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहा.थेट तडीपारी आणि कठोर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल!"यावेळी सर्व २२० गुन्हेगारांचे 'इंट्रॉगेशन फॉर्म' भरून घेण्यात आले असून,त्यांच्याकडून प्रतिबंधक कारवाईचे बंधपत्र (बॉण्ड) लिहून घेण्यात आले आहे. म्हणजेच,यापुढे कोणतीही गडबड केल्यास थेट जेलची हवा खावी लागणार आहे.
अहिल्यानगर पोलीस दलाने आता गुन्हेगारांविरोधात 'झिरो टॉलरन्स'चे धोरण स्वीकारले आहे.गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध धंदे,शस्त्र बाळगणारे,फरार आरोपी आणि सराईत गुन्हेगारां विरोधात पोलिसांनी 'सर्च ऑपरेशन' आणि धडक कारवाया सुरू केल्या आहेत. गुन्हेगारांनी गुन्हेगारीचे जग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे,हाच या विशेष मोहिमेमागचा उद्देश आहे.मात्र,जे ऐकणार नाहीत, त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.या संपूर्ण मोहिमेचे नियोजन स्वतःपोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले होते.या विशेष मोहिमेदरम्यान:अपर पोलीस अधीक्षक:श्री वैभव कलुबर्मे,दक्षिण विभागातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.पोलीस प्रशासनाच्या या 'धडक' भूमिकेमुळे सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असली, तरी गुन्हेगारी विश्वात मात्र सध्या प्रचंड घबराट आणि शांतता पसरली आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यापुढेही अशाच प्रकारच्या 'अदृश्य आणि कठोर' कारवाया सुरूच राहतील.


No comments