वेळुंजे येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा जयवंत हागोटे त्रंबकेश्वर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) वेळुंजे येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्...
वेळुंजे येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वेळुंजे येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक आदिवासी संस्कृतीचा जागर करत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर भव्य आदिवासी सांस्कृतिक शोभायात्रेला सुरुवात झाली.
शोभायात्रा वेळुंजे बस स्टँड, राजवाडा, चावडी, हनुमान मंदिर, कोळीवाडा मार्गे क्रांतिवीर राघोजी भांगरे चौकात पोहोचली. या शोभायात्रेत आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते टारपा नृत्य, मोरगा नृत्य,आणि कांबड नाच. पारंपरिक वाद्यांच्या तालावर सादर झालेल्या या लोककला आणि नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध आदिवासी सांस्कृतिक नृत्यांचे सादरीकरण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमाला हजारो नागरिकांची उपस्थिती लाभली. आदिवासी समाजाची परंपरा, कला, संस्कृती आणि लोकजीवनाची ओळख पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा सुंदर संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

No comments