adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी व ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

  ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी व ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा  किरण धायले अंतुर्ली संपादक – हेम...

 ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी व ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा 


किरण धायले अंतुर्ली

संपादक – हेमकांत गायकवाड

अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच ग्रंथपाल दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

तसेच ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी वाचनालयाचे ग्रंथपाल अनिल नावकर व कर्मचारी शांताराम महाजन यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात वाचनालयाचे अध्यक्ष एस. ए. भोई सर यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. अंतुर्ली येथील श्रीराम मंदिर परिसरातील महादेव मंदिर सुमारे २५० वर्षांपूर्वी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकाळात बांधण्यात आल्याचे सांगत, मंदिरावरील नक्षीकाम व रंगरंगोटी आजही सुस्थितीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

अहिल्याबाई होळकर यांनी इंदूरपासून अंतुर्लीमार्गे नागपूरपर्यंतच्या मार्गावर सैन्याला व प्रवाशांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी विविध ठिकाणी पायविहिरी बांधल्या होत्या. त्यापैकी अंतुर्ली येथील पायविहीर आजही सुस्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी धर्मशाळांची उभारणी करण्यात आली होती. अंतुर्ली येथे त्याच जागेवर आज ग्रामपंचायत कार्यालय असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी समाजाला दिलेली शिकवण, त्यांचे लोककल्याणकारी कार्य आणि सामाजिक बांधिलकी सर्व समाजबांधवांनी आत्मसात करून ती आपल्या आचरणात आणावी, असे आवाहन एस. ए. भोई यांनी केले.

कार्यक्रमास सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी सुनील पगारे, पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन चुनीलाल सोनवणे, माजी प्राचार्य बी. डी. बारी, पोलीस पाटील किशोर मेढे, शेख जाफर शेख मुसा, राजेंद्र शिरतुरे, दूध डेअरीचे संचालक भाऊराव महाजन, कौतिकराव सोनवणे, सुनील पाटील, विवेक कुलकर्णी, प्रकाश कोळी यांच्यासह वाचनालयाचे मान्यवर वाचक, समाजबांधव, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक अनिल वाडीले, ग्रंथपाल अनिल नावकर, शांताराम महाजन व किरण धायले यांनी परिश्रम घेतले.

No comments