इन्स्टाग्रामवरील 'त्या' कमेंट्स पडल्या चांगल्याच महागात .. तोफखाना पोलिसांची धडक कारवाई!दोन स्वतंत्र गुन्हे दाखल सचिन मोकळं अहिल्...
इन्स्टाग्रामवरील 'त्या' कमेंट्स पडल्या चांगल्याच महागात .. तोफखाना पोलिसांची धडक कारवाई!दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- सोशल मीडियाचा वापर करताना जरा जपूनच! जराशी हुशारी अन् एका चुकीच्या कमेंटमुळे थेट कोठडीची हवा खावी लागू शकते,याचा प्रत्यय अहिल्यानगरमध्ये आला आहे. भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर इन्स्टाग्रामवर दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या कमेंट्स करणे काहींना भलतेच महागात पडले आहे.सोशल मीडियावरील या वादग्रस्त हालचालींची तात्काळ दखल घेत तोफखाना पोलिसांच्या पथकाने थेट गुन्हे दाखल करून कारवाईचा दणका दिला आहे.१२ ऑगस्ट २०२६ रोजी इन्स्टाग्रामवर या घटनेबाबत एक पोस्ट व्हायरल झाली होती.या पोस्टवर कायदा-सुव्यवस्थेला गालबोट लागेल आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल,अशा आक्षेपार्ह कमेंट्स अपप्रवृत्तीच्या इसमांनी केल्या.
याची गांभीर्याने दखल घेत, पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या सूचनेवरून पो.हे.कॉ. बाळासाहेब खामकर आणि पो.हे.कॉ.तनवीर शेख यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १९२ व ३५३(२) अंतर्गत गुन्हा रजि. नं. ६९१/२०२६ आणि ६९२/२०२६ असे दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यावेळी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी इशारा दिला की,कोणत्याही धर्माच्या किंवा जातीच्या भावना दुखावतील अशी पोस्ट किंवा कमेंट सोशल मीडियावर केल्यास गय केली जाणार नाही.अशा लोकांवर कडक कायदेशीर कारवाई अटळ आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्माका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलिसांनी केली आहे.

No comments