आदिवासी संस्कृती, ज्ञानपरंपरा आणि निसर्गसंवर्धनाची परंपरा जपली पाहिजे ः प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित अहिल्यानगरमध्ये जागतिक आदिवासी दिन ...
आदिवासी संस्कृती, ज्ञानपरंपरा आणि निसर्गसंवर्धनाची परंपरा जपली पाहिजे ः प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित
अहिल्यानगरमध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा
श्रीरामपूर वृत्तसेवा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आदिवासी समाज निसर्गाला लुबाडत नाही, तर निसर्गाशी सहजीवन साधत त्याचे संवर्धन करतो. जल, जंगल, जमीन, नद्या आणि डोंगर यांच्याशी आदिवासी समाजाची अतूट नाळ जोडलेली आहे. धरतीमातेबद्दल कृतज्ञता बाळगणारी आदिवासी संस्कृती ही समृद्ध ज्ञानपरंपरा, जीवनमूल्ये आणि निसर्गसंवर्धनाची शिकवण देणारी परंपरा आहे. ही संस्कृती, ज्ञानपरंपरा आणि निसर्गाशी असलेले नाते नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांनी केले.
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी सामाजिक बहुउद्देशीय संस्था, अहिल्यानगर यांच्यावतीने टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
यावेळी माजी नगरसेविका प्रतिमा भांगरे, कार्यकारी अभियंता किरण देशमुख, सेवानिवृत्त साखर आयुक्त ज्ञानदेव मुकणे, सेवानिवृत्त अधीक्षक रामभाऊ कचरे, सुरेश रामजी देशमुख, संजय गंभीरे, धुळे येथील उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे, प्रा. भाऊराव नाडेकर, अॅड. लक्ष्मण डामसे, माजी सहसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ, प्रा. डॉ. नितीन तळपाडे, आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक संजय साबळे तसेच संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ सावळे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांनी आदिवासी संस्कृतीतील निसर्गपूजेचे महत्त्व अधोरेखित केले. आदिवासी समाजाची जीवनपद्धती जल, जंगल आणि जमिनीशी जोडलेली आहे. जल, जंगल आणि जमीन टिकली तर निसर्ग टिकेल आणि निसर्ग टिकला तर संपूर्ण मानवजातीचे अस्तित्व सुरक्षित राहील, हा आदिवासी जीवनदृष्टिकोन आजच्या काळात संपूर्ण समाजासाठी मार्गदर्शक ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले.
प्रा. डॉ. नितीन तळपाडे यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी शिक्षण आणि संघटन आवश्यक असल्याचे सांगितले. नव्या पिढीने उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. पी. डी. गांडाळ यांनी आधुनिक विकासाच्या प्रवाहात सहभागी होताना आदिवासी समाजाने आपली संस्कृती, परंपरा आणि निसर्गाशी असलेले नाते कायम जपावे, असे सांगितले.
आदिवासी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेने जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम केवळ नृत्य-गाणे आणि मनोरंजनापुरता मर्यादित न ठेवता कर्तृत्वाचा सन्मान, गुणवंतांना प्रोत्साहन आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा सामाजिक उपक्रम म्हणून त्याचे नियोजन केले. गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे युवक-युवती तसेच सामाजिक आणि शासकीय सेवेत योगदान देऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांचा सन्मान केला.
कार्यक्रमात आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या प्रारंभी पारंपरिक वेशभूषेत भव्य आणि शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात आली. हातात विविध संदेशांचे बॅनर घेऊन समाजबांधव घोषणांच्या गजरात सहभागी झाले होते. आदिवासी समाजाचे दैवत, क्रांतिकारक आणि महापुरुषांच्या विचारांचा जागर तसेच ‘शिका, संघटित व्हा आणि पुढे जा’ असा संदेश देणारे फलक मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. मिरवणुकीत महिला, युवक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ समाजबांधवांचा मोठा सहभाग होता. पारंपरिक वाद्ये, लोककला, पावरा नृत्य आणि पारंपरिक वेशभूषेमुळे आदिवासी संस्कृतीचे वैभवपूर्ण दर्शन घडले.
कोहणे, ता. अकोले येथील राजा हरिश्चंद्र लेझीम पथकाने मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. पथकातील सर्व कलावंतांचा व वाजंत्री यांचा संस्थेच्यावतीने प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
सहादु भांगरे, डॉ. विष्णू बुळे, अशोक धिंदळे, प्रा. डॉ. नितीन तळपाडे, लेफ्टनंट प्राध्यापक भरत डगळे, चिंधू भांगरे, दिगंबर नवाळी, साईनाथ वाळेकर आणि यशवंत झडे यांना आदिवासी समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच दिनकर भांगरे, मनोहर कोंडार, रामचंद्र सुपे, निवृत्ती गभाले आणि विठ्ठल म्हशाळ यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सन्मान करण्यात आला. तसेच सिद्धी धिंदळे, अथर्व भांगरे, ज्योती भांगरे, अवंतिका सावळे, तेजस गोडे आणि आदिश्री बोकड यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ सावळे, उपाध्यक्ष हिरामण पोपेरे, सचिव कविराज बोटे, सहसचिव शिवानंद भांगरे यांच्यासह सुभाष भांगरे, दिनकर भांगरे, भरत साबळे, सोमनाथ शिंगाडे, प्रा. भाऊराव नाडेकर आणि तुकाराम बारामते यांनी विशेष परिश्रम घेतले.
आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, कर्मचारीवर्ग, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. सांस्कृतिक वारशाचा अभिमान, कर्तृत्वाचा सन्मान, गुणवंतांना प्रोत्साहन, महिलांना सन्मानाचे स्थान, मुलींच्या शिक्षणाला दिशा, जल-जंगल-जमिनीच्या संवर्धनाची जाणीव आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा जागतिक आदिवासी दिनाचा सोहळा केवळ उत्सव न ठरता समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम ठरला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि वृक्षपूजन करून मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. जगन्नाथ सावळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. भाऊराव नाडेकर आणि तुकाराम बारामते यांनी सूत्रसंचालन केले. हिरामण पोपेरे यांनी आभार मानले.
--------------------------------------------------
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments