बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्यासह पेपर लीक प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी; महाबोधी ...
बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्यासह पेपर लीक प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी; महाबोधी महाविहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्याची मागणी
जळगांव प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जळगाव : बहुजन समाज पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना सलग दोन निवेदने सादर करण्यात आली. या निवेदनांमध्ये सरकारच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध करण्यासह देशातील विविध राज्यांमध्ये वारंवार होत असलेल्या पेपर लीकच्या घटनांबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांच्या मागण्या शासनाने समजून घेऊन त्यावर योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. झारखंड, तेलंगणा, उत्तराखंड, बिहार आदी राज्यांमध्ये पेपर लीकच्या घटना घडत असल्याचा आरोप करत या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच NEET परीक्षेच्या पद्धतीबाबत पुनर्विचार करून पूर्वीची परीक्षा प्रणाली लागू करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर-मंतरसह विविध ठिकाणी केलेल्या आंदोलनांदरम्यान दाखल करण्यात आलेले कथित खोटे गुन्हे रद्द करण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली.
याशिवाय बिहारमधील महाबोधी महाविहार हे भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्याचे पवित्र व जगभरातील बौद्धांचे श्रद्धास्थान असल्याचे नमूद करून, महाविहारावरील इतर धार्मिक घटकांचे कथित अतिक्रमण दूर करून तो बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन यापूर्वीही माथेरो भदंत नागार्जुन सुरई आणि बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आले असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला.
तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या विविध बौद्ध लेण्या व गुंफांमध्येही अतिक्रमण होत असल्याचा आरोप करण्यात आला असून, संबंधित लेण्या व गुंफा बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
हे निवेदन बहुजन समाज पार्टीचे जळगाव जिल्हा महासचिव सचिन ए. बाविस्कर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. यावेळी चोपडा विधानसभा अध्यक्ष सुरेश एम. बारेला, मुक्ताईनगर विधानसभा अध्यक्ष आवेश खाटीक, चोपडा विधानसभा उपाध्यक्ष बत्तिसासे, चोपडा विधानसभा महासचिव प्रवीण निकम, चोपडा विधानसभा बीव्हीएफ संयोजक तुषार आर. सिरसाट आणि कार्यकर्ते सुकदेव एन. सोनवणे उपस्थित होते.
बहुजन समाज पार्टीच्या वतीने मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

No comments