प्रकाश विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मोठे वाघोदे येथे एचआयव्ही/एड्स जनजागृती व किशोरवयीन आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न! रावेर प्रतिनिधी म...
प्रकाश विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मोठे वाघोदे येथे एचआयव्ही/एड्स जनजागृती व किशोरवयीन आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या (NACO) मार्गदर्शक सूचनांनुसार, 'इंटेंसिफाइड कॅम्पेन' अंतर्गत प्रकाश विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, मोठे वाघोदे (ता. रावेर) आणि आय.सी.टी.सी. (ICTC) ग्रामीण रुग्णालय रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेमध्ये एचआयव्ही/एड्स (HIV/AIDS) जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना एचआयव्ही/एड्सची शास्त्रीय माहिती, संसर्गाचे विविध मार्ग, प्रतिबंधात्मक उपाय आणि शासनातर्फे मिळणाऱ्या मोफत उपचारांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच 'एचआयव्ही आणि एड्स (प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा' समजावून सांगताना बाधित व्यक्तींना मिळणारे कायदेशीर संरक्षण, त्यांचे हक्क आणि गोपनीयतेचा अधिकार याविषयी विद्यार्थ्यांना विशेष जागरूक करण्यात आले. या मुख्य विषयासोबतच, शाळेतील किशोरवयीन मुला-मुलींना त्यांच्या वयानुसार येणाऱ्या शारीरिक-मानसिक बदलांविषयी व आरोग्याविषयी मोलाचे मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यात आले.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रश्नोत्तरी सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे आणि प्रश्नांचे आय.सी.टी.सी. ग्रामीण रुग्णालय रावेर येथील समुपदेशक महेंद्र सुरवाडे आणि सुनील महाजन यांनी अत्यंत समाधानकारक व शास्त्रीय निरसन केले. शंका निरसनानंतर उपस्थित सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक श्री व्ही एस महाजन शिक्षक वृंद आणि आरोग्य कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. विद्यालय प्रशासनाच्या आभारप्रदर्शनाने या यशस्वी शासकीय उपक्रमाची अधिकृत सांगता झाली.


No comments