सिरसोडीतील अन्नत्याग उपोषण अखेर मागे; लढाई संपलेली नाही, ही तर सुरुवात बुलढाणा प्रतिनिधी : अमोल बावस्कर (संपादक : हेमकांत गायकवाड) नांदुरा ...
सिरसोडीतील अन्नत्याग उपोषण अखेर मागे; लढाई संपलेली नाही, ही तर सुरुवात
बुलढाणा प्रतिनिधी : अमोल बावस्कर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
नांदुरा -सिरसोडी येथील भवानी माता मंदिराजवळील नाल्यावर पुलाच्या बांधकामासाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग उपोषण अखेर मागे घेण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे, तसेच ग्रामस्थ ज्ञानदेव भोलवणकर व मारोती भोलवणकर हे उपोषणाला बसले होते.पुलाच्या प्रश्नावर आमदार चैनसुख संचेती यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य विलास पाटील, अॅड. प्रभाकर म्हैसागर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उबरहंडे साहेब तसेच सिरसोडीतील सर्व ग्रामस्थ यांच्या सहमतीने उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी ग्रामस्थांनी स्पष्ट केले की, उपोषण मागे घेतले असले तरी पुलाची मागणी मागे घेतलेली नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढील दोन दिवसांत ग्रामस्थांच्या वतीने एक शिष्टमंडळ आमदार चैनसुख संचेती यांची भेट घेऊन पुलाच्या कामासाठी पाठपुरावा करणार आहे.“ही लढाई अजून संपलेली नाही, ही तर सुरुवात आहे,” असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी दिला.पुलाच्या प्रश्नावर केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कार्यवाही झाली पाहिजे, अशी ग्रामस्थांची ठाम भूमिका आहे. उडवाउडवीची उत्तरे किंवा भूलथापा देण्याचा प्रयत्न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना जशास तसे उत्तर देईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.


No comments