महात्मा फुले कृषी विद्यापीठात फुले हरित अभियानाचा शुभारंभ फुले हरित अभियानातून पर्यावरण संवर्धनाची व्यापक चळवळ उभारणार - कुलगुरू डॉ. विला...
महात्मा फुले कृषी विद्यापीठात
फुले हरित अभियानाचा शुभारंभ
फुले हरित अभियानातून पर्यावरण संवर्धनाची व्यापक चळवळ उभारणार - कुलगुरू डॉ. विलास खर्चे
जावेद शेख / राहुरी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून, फुले हरित अभियान हा त्यापैकी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांमध्ये दरवर्षी हे अभियान राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करण्यात येणार असून पर्यावरण संवर्धनाची लोक चळवळ उभी करण्याचा मानस आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी वृक्षलागवडीचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात फुले हरित अभियानांतर्गत वृक्षलागवड कार्यक्रमाचा शुभारंभ कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीने या अभियानांतर्गत व्यापक वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील, नियंत्रक डॉ. सचिन नांदगुडे, विभागप्रमुख डॉ. भीमराव कांबळे, डॉ. दिनकर कांबळे, डॉ. राजेंद्र हिले, डॉ. उत्तम कदम, उपकुलसचिव (प्रशासन) श्रीमती स्वाती निकम, उपकुलसचिव (विद्या) विजय पाटील व बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र काशीद उपस्थित होते.
या अभियानांतर्गत मध्यवर्ती रोपवाटिका, गो संशोधन व विकास प्रकल्प तसेच मेंढी प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर वृक्षलागवड करण्यात आली. विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात फुले हरित अभियानांतर्गत आतापर्यंत ८,००० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांमध्ये या अभियानांतर्गत ५०,००० हून अधिक वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
यावेळी मेंढी प्रकल्पाचे प्रमुख डॉ. रवींद्र निमसे यांनी मेंढी प्रकल्पामध्ये केलेल्या उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्याबद्दल कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. वृक्षलागवड मोहिमेत विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यापीठातील सर्व कर्मचारी प्रक्षेत्रावर सहभागी होऊन वृक्षलागवडीचा आनंद घेत असल्याचे उत्साहपूर्ण चित्र यावेळी पाहावयास मिळाले. पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी सामूहिकपणे स्वीकारून प्रत्येकाने लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला. फुले हरित अभियान अंतर्गत आयोजित या वृक्षलागवडीचे नियोजन डॉ. मृणाल आजोतीकर आणि डॉ. मनोहर धादवड यांनी केले.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments