शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘झोनल आविष्कार 2026’ उत्साहात संपन्न अहिल्यानगर / प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) स्वास्थ्यादर्पण प्र...
शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘झोनल आविष्कार 2026’ उत्साहात संपन्न
अहिल्यानगर / प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
स्वास्थ्यादर्पण प्रतिष्ठानच्या शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, धोत्रे बुद्रुक,ता.पारनेर, जि.अहिल्यानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU), लोणेरे अंतर्गत आयोजित विभागीय स्तरावरील ‘झोनल आविष्कार 2026’ संशोधन स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली. विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्ती, नवसंकल्पना आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर व जालना विभागातून तब्बल 239 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपले कल्पक शोधप्रकल्प सादर केले असे संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रशांत शिंदे यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे आविष्कार समन्वयक डॉ. संजय खोब्रागडे उपस्थित होते. तसेच DBATU फार्मसी शाखेचे सहाय्यक डीन डॉ. संतोष शेळके आणि किरण साळवे यांनी सन्माननीय उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यापीठाच्या नियमावलीनुसार एकूण ६ विविध ज्ञानशाखांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ व विद्यापीठ प्रतिनिधींनी सर्व शाखांतील प्रकल्पांचे परीक्षण केले. कृषी व पशुसंवर्धन शाखेमध्ये परीक्षक म्हणून डॉ. चंद्रशेखर हिवरे (माजी विभागप्रमुख, डॉ. बा.आं.म.वि., छत्रपती संभाजीनगर) व डॉ.सुनील सांगळे (शासकीय विज्ञान संस्था, छत्रपती संभाजीनगर) यांनी काम पाहिले. मानव्यशास्त्र, भाषा व ललित कला मध्ये डॉ. विशाखा कोलांबिकर (शासकीय तंत्रनिकेतन, छत्रपती संभाजीनगर) आणि प्रा.रोशन बोंडे (DBATU विद्यापीठ प्रतिनिधी) यांनी मूल्यांकन केले. कॉमर्स, मॅनेजमेंट आणि लॉ शाखेमध्ये डॉ. संजय खोब्रागडे (निरीक्षक / विद्यापीठ प्रतिनिधी) व प्रा. प्रतिमा पाडघन (सॉफ्टवेअर तज्ज्ञ, एन्सोन्नो टेक्नॉलॉजीज) यांनी परीक्षण केले.पुअर सायन्स मध्ये डॉ.सुप्रिया राऊत (विद्यापीठ प्रतिनिधी),डॉ. सिद्धार्थ सरकटे आणि प्रा.मिलिंद तपासे (मिलिंद सायन्स कॉलेज, छत्रपती संभाजीनगर) यांनी परीक्षकाची जबाबदारी सांभाळली.
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान मध्ये डॉ. दिलीप अलदार (निरीक्षक/विद्यापीठ प्रतिनिधी), डॉ. नागसेन बनसोड (निरीक्षक, जेएसपीएम विद्यापीठ, पुणे) व प्रा.यामिनी बांबोळे (सॉफ्टवेअर डेव्हलपर, पुणे) यांनी काम पाहिले. वैद्यकशास्त्र व फार्मसी शाखेमध्ये प्रा.कुणाल कांबळे (विद्यापीठ प्रतिनिधी), डॉ. जितेंद्र डोंगरे (शासकीय रुग्णालय, चिकलठाणा) आणि डॉ. भीमाबाई मुनेश्वर (डॉ.बा.आं.म.वि., छत्रपती संभाजीनगर) यांनी गुणवत्तेचे निकष तपासून पदवी गटातून १४ तसेच पदव्युत्तर पदवी गटातून 12 विजेते निवडल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयदीप पवार यांनी दिली.
परीक्षकांनी काटेकोर मूल्यमापना नंतर प्रत्येक शाखेतून उत्कृष्ट व नावीन्यपूर्ण प्रकल्पांची विजेते म्हणून निवड केली. पारितोषिक वितरण सोहळ्यात सर्व विजेत्या स्पर्धकांना मेडल्स आणि प्रमाणपत्रे देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे, सचिव सौ. सोनाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.जयदीप पवार, महिला समन्वयक डॉ.प्राची कानवडे, पुरुष समन्वयक प्रा.अमरसिंग देवढे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि सपोर्टिंग स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद
खान अ.नगर 9860477869
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments