adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिरपूर तालुक्यात बोगस वजनकाटे व विनापरवाना कापूस खरेदीचा संशय! शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी मानव विकास पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन; संयुक्त तपासणी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी

 शिरपूर तालुक्यात बोगस वजनकाटे व विनापरवाना कापूस खरेदीचा संशय! शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी मानव विकास पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन...

 शिरपूर तालुक्यात बोगस वजनकाटे व विनापरवाना कापूस खरेदीचा संशय!

शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी मानव विकास पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन; संयुक्त तपासणी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी  


शिरपूर | प्रतिनिधी

[संपादक - हेमकांत गायकवाड] 

शिरपूर तालुक्यात कापूस खरेदीचा हंगाम सुरू होत असताना काही कापूस खरेदीदारांकडून विनापरवाना वजनकाटे वापरणे, वजनकाट्यांची वैधता तपासलेली नसणे तसेच आवश्यक परवाने व प्रमाणपत्रांशिवाय कापूस खरेदी-विक्री सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची संभाव्य आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी मानव विकास पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार, शिरपूर यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, धुळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सहाय्यक नियंत्रक वैधमापनशास्त्र विभाग, तालुका कृषी अधिकारी आणि संबंधित बाजार समितीच्या सचिवांना पाठविण्यात आल्या आहेत.दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या शेतीखर्चामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या कापसाची विक्री करताना वजनात तफावत झाल्यास किंवा चुकीच्या वजनकाट्यांचा वापर झाल्यास त्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे कापूस खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता राखणे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे योग्य वजन व योग्य मोबदला मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विनापरवाना खरेदीदारांची तपासणी करण्याची मागणी

तालुक्यातील काही कापूस खरेदीदारांकडून वैध परवाने, आवश्यक कागदपत्रे आणि वजनकाट्यांची वैधता प्रमाणपत्रे नसतानाही खरेदी केली जात असल्याची शक्यता निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणाची केवळ कागदोपत्री चौकशी न करता प्रत्यक्ष खरेदी केंद्रांवर जाऊन तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महसूल विभाग, कृषी विभाग, वैधमापनशास्त्र विभाग, बाजार समिती आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पथक स्थापन करून शिरपूर तालुक्यातील गावोगावी सुरू असलेल्या कापूस खरेदी केंद्रांची तपासणी करावी. खरेदीदारांकडे आवश्यक परवाने आहेत का, वजनकाटे प्रमाणित आहेत का आणि प्रत्यक्ष वजन योग्य पद्धतीने केले जाते का, याची खातरजमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 


शेतकऱ्यांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करा

कापूस विक्री करताना वजनात तफावत, वजनाची पावती न देणे, वजनकाट्याच्या अचूकतेबाबत संशय किंवा योग्य मोबदला न मिळणे अशा तक्रारी उद्भवल्यास त्यांची स्वतंत्र चौकशी करावी. दोष आढळल्यास संबंधितांवर लागू कायदे व नियमांनुसार कारवाई करावी, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कापूस खरेदीच्या ठिकाणी शेतकऱ्यांना वजनाची पारदर्शक पावती किंवा नोंद उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. संयुक्त तपासणीचा अहवाल सार्वजनिक करून करण्यात आलेल्या कारवाईची माहिती शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

दुष्काळामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कष्टाच्या उत्पन्नावर चुकीच्या वजनकाट्यांमुळे किंवा अनधिकृत खरेदी व्यवहारांमुळे गदा येऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने विशेष तपासणी मोहीम राबवावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर संबंधित कायद्यानुसार दंडात्मक व आवश्यक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. प्रशासनाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी उपलब्ध कायदेशीर व लोकशाही मार्गांचा अवलंब करून पुढील पाठपुरावा करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हिरा वाकडे, वसीम खाटीक प्रदेशाध्यक्ष मानव विकास पत्रकार संघ, विभागीय सचिव बी व्हि गिरासे, सल्लागार एकनाथ वाघ, तालुकाध्यक्ष कैलास राजपुत,साबीर मनियार,बी के देसले,एन एस बडगुजर, शहराध्यक्ष भटु धनगर, आणि शेतकरी चेतन कोळी , जयेश तावडे, सिध्दार्थ वाघ, रवींद्र वाघ उपस्थित होते.. आता प्रशासन या निवेदनाची कितपत दखल घेते, संयुक्त तपासणी कधी सुरू होते आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जातात, याकडे शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

No comments