रावेर तालुक्यासह सावदा व मोठा वाघोदा परिसरात दुर्गा विसर्जन सोहळा शांततेत संपन्न 'जय माता दी' च्या जयघोषात दुर्गामातेचा निरोप; रावे...
रावेर तालुक्यासह सावदा व मोठा वाघोदा परिसरात दुर्गा विसर्जन सोहळा शांततेत संपन्न
'जय माता दी' च्या जयघोषात दुर्गामातेचा निरोप;
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यासह सावदा व मोठा वाघोदा परिसरात नवरात्रोत्सवानंतर दुर्गामातेच्या विसर्जन मिरवणुका शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. मोठा वाघोदा बुद्रुक येथे विविध दुर्गोत्सव मंडळांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विसर्जन मिरवणुकीत नामांकित बँड पथकांनी सहभाग घेतल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
मोठा वाघोदा येथे यंदा एकूण सात दुर्गोत्सव मंडळांनी दुर्गामातेची स्थापना केली होती. त्यापैकी पाच मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. यामध्ये श्रीराम दुर्गोत्सव मित्र मंडळ, गणेशनगर; मातृभूमी दुर्गोत्सव मित्र मंडळ, माळीवाडा; मातोश्री नवदुर्गा उत्सव मंडळ, चक्रधरनगर; जय भवानी नवदुर्गा मंडळ, गोदाम परिसर आणि तरुण नवदुर्गा मित्र मंडळ, वार्तालाप चौक या मंडळांचा समावेश होता.
लहान चिमुकलींच्या नऊ देवींच्या वेशभूषेने वेधले लक्ष
नवरात्रोत्सवादरम्यान विविध मंडळांच्या वतीने धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मातृभूमी दुर्गोत्सव मित्र मंडळाच्या वतीने लहान मुलींनी नऊ देवींची आकर्षक वेशभूषा साकारली. या चिमुकलींच्या देवीस्वरूपाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक करण्यात आले.
भजनाच्या गजरात दुर्गामातेला निरोप
बसस्थानक परिसरातील मातोश्री दुर्गोत्सव मित्र मंडळाच्या वतीने भजनी मंडळाच्या सहभागातून हरिनामाच्या गजरात दुपारी मिरवणूक काढण्यात आली. भक्तिमय वातावरणात दुर्गामातेला निरोप देण्यात आला. तसेच यशवंतनगर परिसरातील शिवशक्ती दुर्गोत्सव मित्र मंडळाच्या वतीनेही नाचत-गाजत आणि भक्तिभावाने विसर्जन सोहळा साजरा करण्यात आला.
नवरात्रोत्सवाच्या काळात भक्तिमय वातावरणात विविध उपक्रम राबविण्यात आले. विसर्जन मिरवणुकीत भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उत्साह, भक्तिभाव आणि शांततेच्या वातावरणात दुर्गामातेच्या विसर्जन सोहळ्याची सांगता झाली.मिरवणूक शांततेने पार पडण्यासाठी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बशिर तडवी एएसआय विनोद पाटील पोहे कॉ अक्षय शिरोळे पो हे कॉ निलेश बावस्कर पो कॉ विनोद तडवी पो कॉ रविंद्र महाजन गोपनीय शाखेचे पो कॉ राहुल येवले पो कॉ मयुर पाटील यांच्या सह गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला


No comments