adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथे तालुकास्तरीय मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग; जनजागृती, स्वच्छता व गैरसमज दूर करण्यावर मार्गदर्शन

चोपडा येथे तालुकास्तरीय मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग; जनजागृती, स्वच्छता व गैरसमज दूर करण्यावर मार्ग...

चोपडा येथे तालुकास्तरीय मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात

शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग; जनजागृती, स्वच्छता व गैरसमज दूर करण्यावर मार्गदर्शन




चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


चोपडा, दि. १ ऑक्टोबर २०२६ : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पंचायत समिती, चोपडा यांच्या आयोजनाने तालुकास्तरीय मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण ऑक्सफर्ड विद्यालय, चोपडा येथे गुरुवारी (दि. १) उत्साहात पार पडले.

सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या या प्रशिक्षणात इयत्ता ६ वी ते १२ वीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संगीता मॅडम, अधिव्याख्याता, डाएट जळगाव तसेच केंद्रप्रमुख वैशाली मॅडम उपस्थित होत्या. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच प्रशिक्षणातील मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला.

किशोरवयीन मुली व महिलांमध्ये मासिक पाळीबाबत योग्य माहिती व जनजागृती निर्माण करणे, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे तसेच मासिक पाळीशी संबंधित गैरसमज दूर करणे हा प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता.

प्रशिक्षणात रेखा पाटील, मनीषा पाटील, प्राची अमोदकर, वैशाली पाटील व तृप्ती पाटील यांनी सुलभक म्हणून मार्गदर्शन केले. विविध विषयांवर चर्चा, प्रश्नोत्तर व शंका-समाधानाच्या माध्यमातून शिक्षकांचा सक्रिय सहभाग घेण्यात आला.

प्रशिक्षणादरम्यान गटकार्य घेण्यात आले. सहभागी शिक्षकांनी गटाच्या माध्यमातून पेपर प्रेझेंटेशन तयार करून त्याचे सादरीकरण केले. यासोबतच तज्ज्ञांचे मार्गदर्शन, खुली चर्चा, शंका-समाधान तसेच विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अजित पाटील व विशेष शिक्षक प्रशांत सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ऑक्सफर्ड विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिपाई यांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर ‘ऑल इन वन फ्रेम’ ग्रुप फोटो घेऊन प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी प्रकल्प अधिकारी, सर्व पर्यवेक्षिका व आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments