फैजपूर-हंबर्डी रस्त्यावर भीषण अपघात; १२ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू, वडील गंभीर जखमी रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणाचा आरोप; ट्रक चालकासह...
फैजपूर-हंबर्डी रस्त्यावर भीषण अपघात; १२ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू, वडील गंभीर जखमी
रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणाचा आरोप; ट्रक चालकासह कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक व अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
फैजपूर-हंबर्डी रस्त्यावर सुरू असलेल्या कामादरम्यान आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन न केल्याचा आरोप असताना, विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अंजाळा येथील १२ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी ट्रक चालकासह रस्त्याचे काम करणाऱ्या ओम कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक ओम कटरे आणि संबंधित अभियंत्याविरुद्ध फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलील कविराज चव्हाण (वय १२, मूळ रा. नेपानगर, ता. बुऱ्हाणपूर; सध्या रा. अंजाळा, ता. यावल, जि. जळगाव) असे मृत बालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलील हा त्याचे वडील कविराज बारक्या चव्हाण यांच्यासोबत शुक्रवारी रात्री दुचाकीने (क्रमांक एमपी ६८ एमएच ९८९४) फैजपूरहून अंजाळा गावाकडे जात होता. हंबर्डी गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात सलीलचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे वडील कविराज चव्हाण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.
रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणाचा आरोप
अपघाताच्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू होते. या कामादरम्यान आवश्यक नियमांचे पालन न करणे, पुरेशी खबरदारी न घेणे आणि मानवी जीवनासह नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल अशा प्रकारे काम केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी अर्जुन मुलसिंग बारेला (वय २५, रा. मांडवा, ता. झिरण्या, जि. खरगोन, मध्य प्रदेश; सध्या रा. अंजाळा) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रक चालक, ओम कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक ओम कटरे आणि संबंधित अभियंता यांच्याविरुद्ध फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देवेंद्र पाटील करीत आहेत
No comments