adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांतील अडचणी दूर करा आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन; जिल्हाधिकाऱ्यांना योग्य सूचना देण्याचे निर्देश

 दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांतील अडचणी दूर करा आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन; जिल...

 दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांतील अडचणी दूर करा

आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन; जिल्हाधिकाऱ्यांना योग्य सूचना देण्याचे निर्देश 


  अशोक कोळी - चोपडा

(संपादक : हेमकांत गायकवाड)  

चोपडा -विधानसभा मतदारसंघातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पंचनामे करताना येणाऱ्या विविध अडचणी तातडीने दूर कराव्यात, यासाठी चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांची जळगाव येथे भेट घेऊन निवेदन सादर केले.

निवेदनात भूसंपादनाच्या नोटिसा प्राप्त झाल्या आहेत; मात्र प्रत्यक्ष भूसंपादित जमिनीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांच्या जमिनीवरील उभ्या पिकांचेही पंचनामे करण्याबाबत शासन स्तरावरून योग्य आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. काही भागांत पावसाचा खंड पडल्यामुळे पिके येण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी पिके काढून नांगरणी केली असल्यास, अशा प्रकरणांत स्थानिक चौकशी करून पंचनामे करण्यात यावेत. तसेच कमी पर्जन्यमानामुळे मूग व उडीद पिकांचे सरासरी उत्पन्न कमी झाले असून, पिके शेतात उभी नसली तरी ई-पिक पाहणीच्या ७/१२ उताऱ्यावरील नोंदीच्या आधारे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी आमदार सोनवणे यांनी केली.

चोपडा मतदारसंघातील आदिवासी भागातील अनेक गावांमध्ये नेटवर्कच्या समस्येमुळे ई-पिक पाहणी ॲपवर पिकांची नोंद करता आलेली नाही. परिणामी ७/१२ उताऱ्यावरही पिकांची नोंद नसल्याने पंचनामे करताना अडचणी निर्माण होत आहेत. अशा क्षेत्रातील शेतकऱ्यांची स्थानिक पातळीवर चौकशी करून त्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक आदेश देण्याची मागणीही करण्यात आली. चोपडा  विधानसभा मतदारसंघात केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. लवकरच केळी पीक विम्याचा हप्ता भरण्यास सुरुवात होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये पीक पंचनामे आणि पीक विम्याच्या नुकसानभरपाईबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पंचनामे केल्यानंतर पीक विम्याची भरपाई मिळेल की नाही, याबाबत स्पष्टता नसल्याने काही शेतकरी पंचनामे करण्यास नकार देत असल्याचे आमदारांनी निवेदनात नमूद केले. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणेला स्पष्ट व योग्य सूचना देण्याची मागणी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या समस्यांची दखल घेत चोपडा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे व नुकसानभरपाईच्या प्रक्रियेत दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 

अशोक कोळी चोपडा प्रतिनिधी 

No comments