मखदुम सोसायटीच्या जुन्या नाणी व नोटांच्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना इतिहासाची अनोखी सफर मुकुंदनगर परिसरातील सुमारे तीन हजार विद्यार्थ्य...
मखदुम सोसायटीच्या जुन्या नाणी व नोटांच्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना इतिहासाची अनोखी सफर
मुकुंदनगर परिसरातील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग; संग्राहक इंजि. सचिन डागा यांच्याकडून ऐतिहासिक चलनांची माहिती
अहिल्यानगर / प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
येथील मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने शहीद अशफाकुल्ला खान व स्वतंत्रता सेनानी बहादूर शाह जफर यांच्या जयंतीनिमित्त पी. ए. इनामदार स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मुकूंदनगर याठिकाणी ऐतिहासिक नाणी व नोटांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना विविध राजवटींमधील चलनांचा इतिहास जाणून घेण्याची अनोखी संधी प्राप्त झाली. मुकुंदनगर परिसरासह शहरातील विविध उपनगरांतील शाळांमधील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या प्रदर्शनात शिवशाही, निजामशाही, मुघल व ब्रिटिश काळातील नाणी आणि नोटांचा संग्राहक इंजिनियर सचिन डागा यांच्या अनमोल संग्रह मांडण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नाणी, अहमदनगरच्या ऐतिहासिक राजवटींतील चलन, काश्मिरी राजांची नाणी, ब्रिटिशकालीन शिक्के व नोटा, संस्थानिक राजांची चलने, पोर्तुगीज नोटा, हैदराबादच्या निजामाच्या काळातील नोटा तसेच स्वतंत्र भारतातील जुन्या व नवीन चलनातील नाणी व नोटा विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरल्या.
याशिवाय स्मारक नाणी, खोटी नाणी, तांत्रिक त्रुटी असलेली नाणी आणि विविध कालखंडांतील दुर्मीळ चलनप्रकारही प्रदर्शनात पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते. या ऐतिहासिक संग्रहाची माहिती नाणे व नोटांचे संग्राहक इंजिनिअर सचिन डागा यांनी विद्यार्थ्यांना सविस्तरपणे दिली. प्रत्येक नाणे आणि नोटेमागील इतिहास, त्यावरील चिन्हे, तत्कालीन राजवटी आणि त्या काळातील आर्थिक व्यवहार यांची माहिती जाणून घेताना विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
पुस्तकांमधून इतिहासाचा अभ्यास करताना अनेकदा केवळ माहिती मिळते; मात्र त्या काळातील प्रत्यक्ष नाणी व नोटा पाहिल्याने इतिहास अधिक जवळून समजतो, याचा अनुभव विद्यार्थ्यांना या प्रदर्शनातून मिळाला. जुन्या चलनाच्या माध्यमातून देशाचा सांस्कृतिक वारसा, विविध राजवटींचा इतिहास आणि काळानुसार बदलत गेलेली आर्थिक व्यवस्था समजून घेण्याची संधी या उपक्रमामुळे उपलब्ध झाली.
यावेळी इकरा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे उपाध्यक्ष इंजिनिअर इकबाल सय्यद, आर्किटेक्ट विकार काझी, विविध प्रकारच्या पुस्तकांचे संग्राहक शब्बीरभाई शेख, डॉ. अशफाक पटेल,प्रा.नवेद बिजापुरे,शफकत सय्यद, जावेद तांबोली,अमजद पठाण,शेख रिजवान बिलाल, पंकज मेहेर, ठाकुरदास परदेशी, तन्वीर चष्मावाला,सलीम सहारा, उबेद शेख आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत आबिद खान यांनी केले.कार्यक्रमास पटेल क्लिनिक, वसीम ज्वेलर्स, जावेद तांबोली, जीएसएम मोबाईल, इकरा सोसायटी आदिंचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शब्बीर शेख यांनी केले. ऐतिहासिक वारशाची ओळख करून देणारे आणि विद्यार्थ्यां मध्ये इतिहासा विषयी जिज्ञासा निर्माण करणारे हे प्रदर्शन शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरले.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान
अ.नगर - 9860477869
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments