adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दिवाळीचा आनंद साजरा करताना आपल्या कष्टाच्या कमाईची आणि मालमत्तेची सुरक्षितता जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे.सहा.पोलीस निरीक्षक गणेश फड

  दिवाळीचा आनंद साजरा करताना आपल्या कष्टाच्या कमाईची आणि मालमत्तेची सुरक्षितता जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे.सहा.पोलीस निरीक्षक गणेश फड  घरफो...

 दिवाळीचा आनंद साजरा करताना आपल्या कष्टाच्या कमाईची आणि मालमत्तेची सुरक्षितता जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे.सहा.पोलीस निरीक्षक गणेश फड 

घरफोडी रोखण्यासाठी मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवा; शेजाऱ्यांना पूर्वकल्पना द्या, सीसीटीव्ही कार्यरत ठेवा आणि सोशल मीडियावर प्रवासाची माहिती शेअर करणे टाळण्याचेही नागरिकांना आवाहन?


रावेर प्रतिनिधी : मुबारक तडवी

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक कुटुंबांनी पर्यटन, नातेवाईकांच्या भेटीगाठी तसेच धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले आहे. मात्र, या काळात अनेक घरे काही दिवस बंद राहणार असल्याने घरफोडी व चोरीच्या घटनांची शक्यता लक्षात घेता सावदा पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

बाहेरगावी जाण्यापूर्वी नागरिकांनी आपल्या प्रवासाची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्याला द्यावी. घरात मोठ्या प्रमाणात रोकड, सोन्या-चांदीचे दागिने किंवा अन्य मौल्यवान वस्तू ठेवणे टाळावे. शक्यतो या वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवाव्यात. घराच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पांडुरंग फड यांनी केले आहे.

शेजाऱ्यांशी समन्वय ठेवा; घराच्या सुरक्षेची काळजी घ्या!

बाहेरगावी जाताना विश्वासू शेजाऱ्यांना आपल्या अनुपस्थितीची पूर्वकल्पना द्यावी. घराचे मुख्य दरवाजे, खिडक्या व इतर प्रवेशमार्ग व्यवस्थित बंद करून कुलूप लावल्याची खात्री करावी. परिसरात अनोळखी व्यक्तींची संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. संशयित व्यक्तींना स्वतःहून पकडण्याचा किंवा मारहाण करण्याचा प्रयत्न न करता पोलिसांना सहकार्य करावे.

सीसीटीव्ही कार्यरत ठेवा; सोशल मीडियावर सावधगिरी बाळगा!

घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्थित सुरू असल्याची खात्री करून घ्यावी. बाहेरगावी जाताना प्रवासाचे फोटो, लोकेशन, वेळापत्रक अथवा घर बंद असल्याची माहिती सोशल मीडियावर सार्वजनिक करणे टाळावे. अशा माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी डिजिटल माध्यमांचा वापर करतानाही सतर्कता बाळगावी.

संशयास्पद हालचाली दिसताच पोलिसांशी संपर्क साधा!

सणासुदीच्या काळात नागरिकांनी स्वतःच्या घरासोबतच परिसराच्या सुरक्षिततेबाबतही जागरूक राहावे. कोणतीही संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा हालचाल निदर्शनास आल्यास विलंब न करता पोलिसांना कळवावे. आपत्कालीन परिस्थितीत डायल ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच सावदा पोलीस स्टेशनचा संपर्क क्रमांक ०२५८४-२२२०४३ यावरही माहिती द्यावी.

दिवाळीचा आनंद साजरा करताना आपल्या कष्टाच्या कमाईची आणि मालमत्तेची सुरक्षितता जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पांडुरंग फड यांनी केले आहे.

No comments