भगवान बिरसा मुंडा:- जल-जंगल-जमिनीच्या रक्षणातून प्रगतीच्या शिखराकडे.. 'जनजातीय गौरव दिना’ निमित्त आदिवासी समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक...
भगवान बिरसा मुंडा:- जल-जंगल-जमिनीच्या रक्षणातून प्रगतीच्या शिखराकडे..
'जनजातीय गौरव दिना’ निमित्त आदिवासी समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा आढावा
दरवर्षी १५ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशभरात ‘जनजातीय गौरव दिवस’ अर्थात धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती म्हणून अत्यंत अभिमानाने साजरा केला जातो.अवघ्या पंचविशीत बलाढ्य ब्रिटिश साम्राज्यशाहीला सळो की पळो करून सोडणारे बिरसा मुंडा हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक देदीप्यमान पर्व आहेत. त्यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आदिवासी समाजाचा कालचा खडतर प्रवास, त्यांना मिळालेले संवैधानिक संरक्षण आणि आजची बदलती सामाजिक-आर्थिक परिस्थितीचा आढावा घेणे ही काळाची गरजच नाही तर त्यांचे खरे स्मरण आहे.
‘उलगुलान’ आणि बिरसा मुंडांचा क्रांतिकारी विचार:-
१५ नोव्हेंबर १८७५ रोजीझारखंडमधील उलिहातू येथे जन्मलेल्या बिरसा मुंडा यांनी आपल्या समाजाला गुलामगिरीच्या शृंखलेतून मुक्त करण्यासाठी ‘उलगुलान’ (महान क्रांती) पुकारला. जल, जंगल आणि जमिनीवर आदिवासींचा नैसर्गिक अधिकार प्रस्थापित करणे, हा त्यांच्या लढ्याचा आत्मा होता. ब्रिटिशांनी आणलेले जाचक वनकायदे आणि स्थानिक जमीनदार-सावकारांच्या शोषणाविरुद्ध त्यांनी समाजाला संघटित केले. त्याचबरोबर समाजाला व्यसनमुक्त, अंधश्रद्धामुक्त आणि स्वाभिमानी बनवण्यासाठी त्यांनी मोठी समाजसुधारणा घडवून आणली. ९ जून १९०० रोजी रांचीच्या तुरुंगात त्यांनी अखेरचा श्वास घेतला; परंतु त्यांनी पेटवलेली क्रांतीची ज्योत आजही तेवत आहे.
कालचा आदिवासी समाज:- संघर्ष, शोषण आणि उपेक्षा ही त्रिसूत्री
म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरची सुरुवातीची काही दशके आदिवासी समाजासाठी अत्यंत संघर्षाची होती.
डोंगरदऱ्यांत आणि घनदाट जंगलांत राहणारा हा समाज आधुनिक जगापासून दूर होता. निसर्गपूजा आणि सामूहिक जीवनपद्धती हे त्यांचे बलस्थान असले, तरी भौगोलिक अलिप्ततेमुळे विकासाची फळे त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाहीत. सावकार, ठेकेदार आणि जमीनदारांकडून या समाजाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि सामाजिक शोषण झाले. स्वतःच्याच जमिनी असूनही ते मजूर बनले.शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि वीज यांसारख्या सुविधांपासून वंचित राहिल्यामुळे समाज मागे राहिला.मात्र स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाने आदिवासी समाजाच्या रक्षणासाठी व विकासासाठी भक्कम तरतुदी केलेल्या आहेत.
संविधानातील महत्त्वाची कलमे:- संविधानाच्या पाचव्या व सहाव्या अनुसूचीमध्ये आदिवासी क्षेत्रांच्या विशेष प्रशासनाची तरतूद आहे. कलम २४४ अन्वये अनुसूचित क्षेत्रांचे नियंत्रण, कलम २७५(१) अंतर्गत आदिवासी विकासासाठी विशेष केंद्रीय निधी, तर कलम ३३० व ३३२ नुसार लोकसभा व विधानसभेत राजकीय आरक्षण देण्यात आले आहे. तसेच कलम ३३८-अ अन्वये स्वतंत्र 'राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग' स्थापन करण्यात आला आहे.पेसा (PESA) कायदा १९९६ मुळे आदिवासी भागातील ग्रामसभांना जल, जंगल, जमीन आणि गौण सारख्या वनोपजावर स्वशासनाचे अधिकार मिळालेले आहेत. वनहक्क कायदा २००६ ने पिढ्यानपिढ्या जंगलात राहणाऱ्या आदिवासींना जमिनीचे मालकी हक्क बहाल केले, तर ॲट्रॉसिटी प्रतिबंधक कायदा १९८९ हा समाजाच्या सन्मानाचे रक्षण करतो.
प्रमुख विकास योजना:- शिक्षणासाठी एकलव्य निवासी शाळा, शासकीय आश्रमशाळा, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आणि उच्च शिक्षणासाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना’ राबवली जात आहे. तसेच वनधन विकास केंद्रे, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना आणि ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ यांसारख्या योजनांतून गावांचा सर्वांगीण विकास साधन्याचा प्रयत्न केला जात आहे.
आजचा आदिवासी समाज
या कायद्यांच्या आणि योजनांच्या बळावर प्रगतीचे नवे क्षितिज गाठण्याचा प्रयत्न करत आहे.प्रगती च्या दिशेने वाटचाल करत आहे.आज डॉक्टर, अभियंते, वकील, शास्त्रज्ञ आणि आयएएस-आयपीएस (IAS-IPS) यांसारख्या प्रशासकीय उच्च पदांवर आदिवासी तरुण-तरुणी आपल्याला बघायला मिळत आहे.ऑलिम्पिकपासून ते आशियाई क्रीडा स्पर्धांपर्यंत आदिवासी खेळाडू देशासाठी पदके जिंकत आहेत. वारली आणि गोंड चित्रकलेने जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवले आहे.कालचा उपेक्षित राहिलेला आदिवासी समाज आज देशाचे सर्वोच्च नेतृत्व करत आहे.भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे जीवनचरित्र आजच्या आदिवासी तरुण-तरुणींसाठी आशेचा नवा किरण ठरले आहे.एका सामान्य शिक्षिका ते देशाच्या प्रथम नागरिक हा त्यांचा प्रवास सिद्ध करतो की, योग्य संधी आणि शिक्षणाच्या जोरावर आदिवासी समाज कोणत्याही शिखरावर पोहोचू शकतो.देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती सारख्या पदावर आदिवासी समाजातील महिला विराजमान होणे, हे बदलत्या भारताचे सर्वात मोठे प्रतीक आहे.
परंतु प्रगती होत असली, तरी विकासाच्या प्रकल्पांमुळे होणारे आदिवासींचे विस्थापन, दुर्गम भागातील आरोग्य समस्या आणि आधुनिकतेच्या प्रवाहात आपली मूळ बोलीभाषा व निसर्गाशी असलेली नाळ टिकवून ठेवणे, ही आजची प्रमुख आव्हाने आहेत. कालचा आदिवासी समाज अस्तित्वासाठी झगडणारा होता, तर आजचा समाज भगवान बिरसा मुंडांनी केलेल्या क्रांती कार्यामुळे स्वाभिमानाने प्रगतीची शिखरे सर करत आहे.म्हणून आज आधुनिक शिक्षण व कायद्यांच्या ज्ञानासोबतच आपली मूळ संस्कृती आणि जल-जंगल-जमिनीचे रक्षण करणे, हीच धरती आबा बिरसा मुंडा यांना खरी आदरांजली ठरेल.
माहिती संकलन:-
श्री संजय ठाकुर सर
उपशिक्षक जे ई स्कूल

No comments