चौगाव किल्ल्यावर तीन दिवसीय गडपूजन उत्साहात संपन्न संयुक्त सर्वेक्षणाची तारीख त्वरित जाहीर करा; दुर्गसेवकांची मागणी विश्राम तेले (चौगाव प्...
चौगाव किल्ल्यावर तीन दिवसीय गडपूजन उत्साहात संपन्न संयुक्त सर्वेक्षणाची तारीख त्वरित जाहीर करा; दुर्गसेवकांची मागणी
विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी)
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
दरवर्षीप्रमाणे यंदाही धनत्रयोदशीपासून सलग तीन दिवस चौगाव किल्ल्यावर गडपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात तालुक्यातील शेकडो दुर्गसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, चोपडा यांच्या वतीने गडपूजन करण्यात आले. सकाळी सात वाजता चोपडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुर्गसेवक एकत्र आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून दुर्गसेवकांनी चौगाव किल्ल्याकडे प्रस्थान केले.
सर्वप्रथम तीर्थक्षेत्र त्रिवेणी महादेव मंदिर येथे पूजन करण्यात आले. त्यानंतर किल्ल्याच्या पूर्वाभिमुख प्रवेशद्वाराला तोरण बांधून परिसराची स्वच्छता करण्यात आली व रांगोळी काढण्यात आली. आई भवानी मंदिरात आरती करून पारंपरिक पद्धतीने गडपूजन करण्यात आले.
या गडपूजन सोहळ्याला तीनशेहून अधिक दुर्गसेवक उपस्थित होते. तसेच चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले, चोपडा येथील श्यामभाऊ परदेशी, अनिल वानखेडे, चौगाव येथील पोलीस पाटील गोरख हरचंद पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पत्रकार व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.
सलग तीन दिवस चाललेल्या या उत्सवात तालुक्यातील पाचशेहून अधिक दुर्गसेवकांनी गडपूजन करून ऐतिहासिक वारशाप्रती आपली श्रद्धा व संवर्धनाची बांधिलकी व्यक्त केली.
संयुक्त सर्वेक्षण रखडल्याने दुर्गसेवकांमध्ये नाराजी
चौगाव किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळावा तसेच पर्यटनस्थळाचा 'ब' दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून विविध दुर्ग संवर्धन संघटनांनी पाठपुरावा करूनही अद्याप चौगाव किल्ला संयुक्त सर्वेक्षणासाठी तारीख निश्चित करण्यात आली नाही.त्यामुळे त्वरित सर्वेक्षणाची तारीख निश्चित करण्यात यावी अशी मागणी दुर्गसेवकांकडून करण्यात आली.

No comments