गुरूंवरील श्रद्धा आणि सेवाभावाचा अनोखा आदर्श! दोन मुलांचे निधन झाले, तरी सुना-नातवंडांनी पूर्ण केली आजींची देहदानाची अंतिम इच्छा चोपडा प्रति...
गुरूंवरील श्रद्धा आणि सेवाभावाचा अनोखा आदर्श!
दोन मुलांचे निधन झाले, तरी सुना-नातवंडांनी पूर्ण केली आजींची देहदानाची अंतिम इच्छा
चोपडा प्रतिनिधी अशोक कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
भोजे (ता पाचोरा) : जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या "तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा" या शिकवणीचा प्रेरणादायी आदर्श भोजे येथील पाटील कुटुंबीयांनी कृतीतून घालून दिला. ८३ वर्षीय भागाबाई तुकाराम पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान करून तो जळगाव खुर्द येथील डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला वैद्यकीय शिक्षणासाठी सुपूर्द करण्यात आला.
विशेष म्हणजे, भागाबाई आजींच्या दोन मुलांचे यापूर्वीच निधन झालेले असतानाही त्यांच्या सुना आणि नातवंडांनी दुःखावर मात करून गुरूंवरील अढळ श्रद्धा जपली. भागाबाई आजींना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या चरणी अपार निष्ठा होती. मृत्यूनंतरही मोक्षप्राप्ती व्हावी आणि गुरूंच्या चरणी स्थान मिळावे, अशी त्यांची मनोमन इच्छा होती. गुरूंनी दिलेल्या सेवाभावाच्या शिकवणीनुसार मृत्यूनंतरही आपला देह दुसऱ्यांच्या उपयोगी पडावा, या संकल्पाला कुटुंबीयांनी प्रत्यक्षात उतरवले.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणीजच्या माध्यमातून झालेले हे २६४ वे मरणोत्तर देहदान असून जळगाव जिल्ह्यातील हे तिसरे देहदान ठरले आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शिक्षणासाठी देहदानाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही घटना समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
देहदान प्रसंगी सूर्यकांताबाई मोतीलाल पाटील, द्वारकाबाई रामलाल पाटील, वसंत मोतीलाल पाटील, योगेश रामलाल पाटील, लक्ष्मीबाई राजेंद्र हिवाळे, सरस्वतीबाई नकुल जाधव, सावित्रीबाई तुकाराम घोंगडे, सोनाली तुकाराम सोनवणे, कविता सुरेश कदम, अर्चना योगेश पाटील, रूपाली वसंत पाटील, प्रथमेश योगेश पाटील व भावेश योगेश पाटील यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.
यावेळी संस्थानचे अंतर्गत लेखा परीक्षक डिगंबर टोके, प्रसिद्धी व मूल्यांकन समिती सदस्य विठ्ठल दांगोडे, महिला जिल्हाध्यक्ष उषाताई कोळी, जिल्हा सचिव विनोद पाटील, जिल्हा कर्नल अरुण सुर्वे, जिल्हा युवा प्रमुख राकेश बाविस्कर, श्रीकथा प्रमुख नरेंद्र खाचणे, माजी जिल्हाध्यक्ष मनोज सोनवणे, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह जळगाव जिल्हा सेवा समिती, पाचोरा तालुका सेवा समिती, भोजे सेवा केंद्र समिती आणि रामानंद संप्रदायाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरूंवरील श्रद्धा, कुटुंबीयांचा त्याग आणि मानवसेवेचा हा संगम समाजासमोर एक मोठा आदर्श निर्माण करणारा ठरला आहे.

No comments